शाळा भरल्या, मात्र पोहोचायला बसच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:00+5:302021-02-05T08:27:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस ...

शाळा भरल्या, मात्र पोहोचायला बसच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत शाळा गाठावी लागणार आहे. यात त्यांचे हाल होणार असून, बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.
जिल्ह्यात १ हजार ६३९ शाळा आहेत. यात पाचवी ते आठवीपर्यंत १ लाख ८५ हजार ८३५ एवढे विद्यार्थी असून, नववी ते बारावीपर्यंत ७८ हजार ६३० विद्यार्थी आहेत. आधी नववीपासून आणि आता पाचवीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात काही गावांत अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आजही बस नसल्याचे दिसत आहे. लाॅकडाऊनंतर हळूहळू बसचे चाक पूर्णपणे धावू लागले असले तरी जिल्ह्यात १०० टक्के बसेस अद्याप पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. याचा फटका सामान्यांना बसत आहे. आता तोच फटका विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. विभागीय नियंत्रक बी. एस. जगनोर हे संवेदनशील असून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, यावर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
मानव विकासच्या बसेस आजपासून धावणार
जिल्ह्यात मानव विकासच्या सात बसेस आहेत. ग्रामीण भागासह वाड्या, वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या तरी बीड जिल्ह्यातील सातही बस या धारूर आगारांतर्गत धावत आहेत. धारूरसह वडवणी व शेजारच्या गावांतील विद्यार्थी शाळेवर पोहोचविण्याचे काम त्या करतात. दररोज ९७० किमी अंतर त्या पार करतात. परंतु इतर गावांमध्येही बसेस सुरू करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरू लागली आहे.
गावांत, वाड्यावर बस नाही
लॉकडाऊन उघडल्यानंतर बसेस काही प्रमाणात धावू लागल्या आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावांत, वाड्यांवर बस पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील लोक आजही जीप, रिक्षा आदी खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करत आहेत. यात आर्थिक भुर्दंडासह अपघातास निमंत्रण मिळत आहे.
बसेस सुरू कराव्यात, अन्यथा आंदोल करू
लॉकडाऊन उघडल्यानंतरही आजही अनेक गावांत रापमची बस पोहोचलेली नाही. ही गंभीर बाब आहे. यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. यावर रापमने वेळीच कारवाई कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू.
- राहुल वाईककर, संभाजी ब्रिगेड, बीड
विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी रापमने उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षणमंत्री व परिवहन मंत्र्यांना माझी विनंती असेल, की त्यांनी या बसेस लवकर सुरू करण्यासाठी कारवाई करावी.
-सुजाता मोराळे, सामाजिक कार्यकर्त्या
आगारप्रमुखांचा कोट
जिल्ह्यात मानव विकासच्या सात बसेस असून, सोमवारपासून त्या धावतील. इतर गावांतही मागणीप्रमाणे बसेस सुरू केल्या जात आहेत. पूर्णच गावात बस सोडण्यासाठी प्रयत्न करू.
- एस. बी. पडवळ
विभागीय वाहतूक अधिकारी, बीड