शाळा ऑनलाईन.. फीस मात्र शंभर टक्के कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:18+5:302021-06-24T04:23:18+5:30
बीड : जिल्ह्यात १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला ऑनलाईन पद्धतीने सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही पालक आणि शाळांमध्ये असलेला ...

शाळा ऑनलाईन.. फीस मात्र शंभर टक्के कशासाठी?
बीड : जिल्ह्यात १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला ऑनलाईन पद्धतीने सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही पालक आणि शाळांमध्ये असलेला शुल्काबाबतचा वाद मिटलेला दिसत नाही. कोरोनाकाळात एक दिवसही शाळा सुरू नव्हत्या. शाळांनी मागील शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिकवणी घेत कसेबसे पूर्ण केले. परंतु या काळात पूर्ण विषयाची शिकवणी झाली नाही. दोन - चार विषयाच्या ऑनलाईन शिकवण्या झाल्या. आमची मुले शाळेत आली नाहीत. शाळांचाही बराचसा खर्च वाचला आहे. शाळा ऑनलाईन आणि फी मात्र शंभर टक्के कशासाठी? असा प्रश्न पालक करीत आहेत. तर शिक्षण ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन खर्च तर तेवढाच येतो, अशी भूमिका शिक्षण संस्थांनी घेतली आहे. त्यामुळे पालक आणि संस्था चालकांमध्ये वाद झडत आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा बंद आहेत. मागील वर्षी अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला. बहुतांश शाळांनी विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले. शासन निर्देशानुसार प्रमुख इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांवर ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. आता चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळांकडून शंभर टक्के फीस मागणी होत आहे. तर दुसरीकडे शाळा ऑनलाईन असल्याने पूर्ण फीस न घेता सवलत द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. अशा परिस्थितीत पालकांची एकजूट लक्षात घेत इंग्रजी माध्यमाच्या संस्था चालकांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संघटनेने १० टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याचे जाहीर करून शासनाने सुद्धा या सर्व शाळांचे पालकत्व स्वीकारून आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
---------
कोरोना लॉकडाऊनमुळे आपली दैनंदिन उपजीविका भागवायची की मुलांना शिक्षण द्यायचे असा प्रश्न पालकांना सतावत आहे. शाळा वर्षभर बंदच होत्या. कोरोनाच्या आधीच्या काळात आम्ही पालकांनी शाळेला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांना कधीही फी मध्ये सवलत मागितली नाही. मात्र आता हा पालकांसाठी संकटाचा काळ असल्याने शाळांनी शंभर टक्के फीस आकारणे योग्य नाही. --
------
मागील वर्षी मोजकेच विषय ऑनलाईन शिकविले. मुलांनी शाळेतील शैक्षणिक साधनांचा वापर केला नाही. कोरोनामुळे पालक आधीच आर्थिक अडचणीत आहेत. शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन शाळांनी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. शाळा ऑनलाईन आणि फीस शंभर टक्के वसूल करणे, त्यासाठी पाल्यांना वेगळी वागणूक देणे असे प्रकार होऊ नयेत. सुवर्णमध्य साधून सवलत दिल्यास पालकही राजी होतील. -- राजेश विणकर, बीड.
---------------
कोरोना काळात शाळा बंद असल्याने शाळांचाही खर्च काही प्रमाणात वाचला आहे. ऑनलाईन शाळेमुळे ठरावीक वेळेत तसेच मर्यादित वापरामुळे विद्युत बिल व स्टेशनरीचा खर्च कमी झाला आहे. पूर्वप्राथमिक विभागाच्या शिक्षक, शिक्षिकांची संख्या कमी झाल्याने करावे लागणारे वेतन वाचले आहे. कमी मनुष्यबळावर शाळा चालते, त्यामुळे खर्च वाचतो.
-------------------
शाळा ऑनलाईन असली तरी खर्च येतोच. शिक्षकांना ऑनलाईनमुळे जास्त वेळ द्यावा लागतो. वेब कॅमेरे,वायफाय, डोंगल, माईकसाठी शाळेला खर्च करावा लागला आहे. तसेच ऑनलाईनचे शिक्षकांना प्रशिक्षण, ऑनलाईनसाठी लागणारे मटेरियल खरेदी केले आहे. गुणवत्तापूर्ण नेटवर्किंगसाठी अनलिमिटेड डाटा खरेदी करावा लागतो. खर्च कमी झालेले नाहीत. बीड जिल्हा इंग्लिश स्कूल असोसिएशनने दहा टक्के फी सवलत देण्याचा निर्णय सामाजिक बांधिलकीपोटी घेतलेला आहे. संस्था चालकही आर्थिक संकटात आहेत. - गणेश मैड, संस्था चालक बीड.
----------
मागील वर्षी तीन विषयांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण होते. यंदा सर्व विषय शिकविले जाणार आहेत. ५० टक्के पालक ऑनलाईनला नापसंती दाखवतात. मग कमी फीस घेऊन शिक्षकांचे पगार कसे करता येणार? संस्थांनी शैक्षणिक साधन साहित्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. शंभर टक्के फीस घेऊनही भागत नाही उलट खर्च वाढलेला आहे. आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडे थकली आहे. आर्थिक संकटामुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तरीही दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला आहे. - अमर भोसले, संस्थाचालक अंबाजोगाई.
--------
जिल्ह्यातील जि. प. शाळा - २,४९१
खासगी अनुदानित शाळा - ७४९
खासगी विनाअनुदानित शाळा - ४३७
---------