अमोल जाधव
नांदुरघाट : सकारात्मक मानसिकता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९६ वर्षांच्या दगडूबाई मारुतीराव जाधवर यांनी कोरोनावर मात करत जगण्याची लढाई जिंकली. कोरोनाला हरवत इतरांनाही त्यातून लढण्याची प्रेरणा देणाऱ्या दगडूबाई या जीएसटी विभागातील उपायुक्त विवेकानंद जाधवर यांच्या आजी आहेत.
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने व दगडूबाईंचा लेक आणि सून बाहेरगावी असल्याने गावातील नातेवाइकांनी त्यांची चाचणी तालुक्याच्या ठिकाणी केली. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्याचे ठरवले; परंतु जुन्या काळातला प्रभाव असल्याने दगडूबाईंनी नकार दर्शविला. ‘मी गेल्यावर मला शेवटचं घरीसुद्धा येऊ देणार नाहीत, कुणाला पाहूसुद्धा देत नाहीत, मला दवाखाना नको,’ असे त्या बोलत होत्या. अखेर नातेवाइकांनी समजूत काढली. मुलगी सिंधूताई हंगे यांनीही आग्रह करीत नातजावई डॉ. श्रीकांत केदार यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दगडूबाईंना दाखल केले.
नातजावयाचे रुग्णालय पाहून अर्धे दुखणे कसे निघून गेले, याचा दगडूबाईंना थांगपत्ताही लागला नाही. उपचारादरम्यान लेक, नातवंडे व नातजावयांनी सकारात्मक आधार दिला. लेकीच्या सासरी फार दिवस राहायचे नसते, अशी धारणा जुन्या लोकांमध्ये चालत आलेली आहे. दगडूबाईदेखील जावयाच्या घरी जास्त दिवस राहत नसतात, असे मुलाला म्हणाल्या. मुलानेही तू बरी झाली की, लगेच घरी जाऊ, असा शब्द देत बोळवण केली. मात्र, जगण्याची इच्छाशक्ती दृढ असल्याने ९६ वर्षांच्या दगडूबाई चार दिवसांतच ठणठणीत झाल्या. कारोनामुक्तीनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अनेकांना जगण्याची ऊर्मी देऊन गेले.
===Photopath===
010621\1622553825057_14.jpg