-मधुकर सिरसट, केजSantosh Deshmukh News: काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हे काय चाललंय अशा प्रतिक्रिया उमटल्या. हो, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशांसमोर सुरू आहे, त्यांच्यासोबत याच प्रकरणात निलंबित असलेल्या पोलिसांनी धुळवड साजरी केली. शुक्रवारी धुलिवंदनाच्या दिवशी केज येथील साईनगर (पूर्व ) परिसरात एकत्र येऊन धुळवड साजरी केली. ते एकत्रित रंगाची उधळण करतानाचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी व्हिडीओ आणि फोटो शेअर करत याबद्दल चिंता व्यक्त केली. या फोटोंमुळे न्यायाधीशही वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज येथील मकोका जलद गती न्यायालयात सुरू आहे. न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण आहे. न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे केज येथील साई नगर (पूर्व) भागातच राहतात. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. त्यापैकी केज येथून बदलून बीडला गेलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, आरोपी सोबत एका हॉटेलात चहा पिणारे व सध्या निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी शुक्रवारी न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवड साजरी केली.
निलंबित पोलीस अधिकाऱ्यांची न्यायाधीशांसोबत धुळवड
अंजली दमानियांनी एक व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, "केज: हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे... संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत."
हे खूप चुकीचे आहे, अंजली दमानियांनी व्यक्त केली खंत
दमानियांनी पुढे म्हटलं आहे की, "पण कोणाबरोबर? संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निंलबित अधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे", अशी खंत दमानियांनी व्यक्त केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी १२ मार्च रोजी पार पडली. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित नव्हते. त्यामुळे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. पहिल्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्रात नसलेली महत्वाची माहिती मागितली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.