बनावट कांदा बियाणे विक्री; पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:41+5:302021-06-25T04:23:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यासह कडा परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतात. यंदाही शेतकऱ्यांनी कांदा ...

बनावट कांदा बियाणे विक्री; पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यासह कडा परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतात. यंदाही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी कृषी सेवा केंद्रातून कांदा बियाणांची खरेदी केली आहे. परंतु, काही महाभाग बनावट कांदा बियाणांची विक्री करताना आढळून आले आहेत. पोलिसांनी आरोपी पकडले आहेत. परंतु, पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आजवर अनेक शेतकऱ्यांची बनावट कांदा बियाणे विक्रीत लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. बनावट कांदा बियाणे विक्री करणारे काही आरोपी पकडले गेले असले तरी पोलिसांना रॅकेटची पाळेमुळे शोधता आली नाहीत. यामुळे पोलिसांच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कडा शहरात बनावट कांदा बियाणे विक्री करताना एका दुकानदाराला अटक केली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेले शेतकरी पुढे येत नसल्याने अडचणी वाढत आहेत. शेतकऱ्यांनी पुढे येऊन सहकार्य केले तर नक्कीच बनावट कांदा बियाणांचे रॅकेट उघडकीस येण्यास मदत होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.