महाशिवरात्रीनिमित्त सजली शिवमंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:16 IST2020-02-21T00:15:12+5:302020-02-21T00:16:37+5:30

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवंमदिरे सजली असून ठिकठिकाणी सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. परळी, चाकरवाडी, बीड तसेच अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात महाशिवरात्री यात्रेचे आयोजन केले आहे.

Sajali Shiva Mandir on the occasion of Mahashivratri | महाशिवरात्रीनिमित्त सजली शिवमंदिरे

महाशिवरात्रीनिमित्त सजली शिवमंदिरे

ठळक मुद्देयात्रेचे आयोजन : विविध धार्मिक कार्यक्रम

बीड : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिवंमदिरे सजली असून ठिकठिकाणी सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. परळी, चाकरवाडी, बीड तसेच अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात महाशिवरात्री यात्रेचे आयोजन केले आहे.
तसेच यात्रेनिमित्त भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सोमेश्वर, पुत्रेश्वर, लोहकरेश्वर, जटाशंकर, बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील काशी विश्वेश्वर मंदिरात देखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी राहणार आहे.
आज कनकालेश्वराला महारुद्राभिषेक, रात्री आतषबाजी
बीड शहराचे ग्रामदैवत श्री कनकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जोरदार तयार केली आहे. शुक्रवारी चार वाजेपासून महारु द्राभिषेक होणार आहे. रात्री कीर्तन व भजन होईल. त्यानंतर बारा वाजता फळे, दही, दूध, मध, उसाच्या रसाचा अभिषेक होतो. तर हरिद्वार येथील गंगेचे पाणी,१००८ बेलाची पाने, जाई, जुई, गुलाब, निशिगंध, कमळ फुलांसह अत्तर स्नान, चंदन स्नान होईल. रात्री बारानंतर ११ पुरोहितांच्या उपस्थितीत लघुरूद्र अभिषेक सोहळा होणार आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खाद्यपदार्थ तसेच खेळण्यांची दुकाने लागली आहेत. महाशिवरात्रीला रात्री ८.३० वाजता शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. कल्याण महाराज गुरव, संजय महाराज गुरव, प्रभाकर महाराज गुरव, चंद्रकांत गुरवसह विश्वस्तांच्या वतीने मंदिर परिसरात यात्रेनिमित्त व्यवस्था केली आहे.
शिवशक्ती गडावर यात्रा
बीडपासून १८ तर पाटोदा येथून २० कि.मी अंतरावर असलेल्या उंखडा येथे शिवशक्ती गडाचे भव्य काम करण्यात आलेले आहे. येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरविण्यात येत आहे. या यात्रेस बीड तसेच डोंगरिकन्ही गटातील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जि.प.सदस्य अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांनी केले आहे. येथे भगवान शंकराचे मोठे मंदिर बांधण्यात आले असून आगळे-वेगळे शिखरही पहायला मिळते.
पापनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम
शहरातील तेलगाव नाका, शाहू आयटीआयच्या जवळ असलेल्या अतिशय पुरातन श्री पापनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळी महारुद्राभिषेक, दिवसभर विविध कार्यक्रम होत आहेत. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. मंदिराची विकासकामे सुरू असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.

Web Title: Sajali Shiva Mandir on the occasion of Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.