ग्रामीण आरोग्य विभाग ‘आजारी’; ४३३ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:31+5:302021-02-08T04:29:31+5:30

बीड : जिल्ह्यात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासह प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा महत्वाची असते. परंतु रिक्त पदांमुळे हीच ग्रामीण ...

Rural Health Department ‘sick’; 433 posts vacant | ग्रामीण आरोग्य विभाग ‘आजारी’; ४३३ पदे रिक्त

ग्रामीण आरोग्य विभाग ‘आजारी’; ४३३ पदे रिक्त

बीड : जिल्ह्यात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासह प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा महत्वाची असते. परंतु रिक्त पदांमुळे हीच ग्रामीण आरोग्य यंत्रणा आजारी पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची २९ तर कर्मचाऱ्यांची ४०४ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामुळे आहे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र तर २९७ आरोग्य उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ एकच अधिकारी आहे. तर काही ठिकाणी एकही अधिकारी नसल्याने शेजारच्या डॉक्टरवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असाच प्रकार उपकेंद्रांतील आहे. सध्या समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त केले असले तरी एएनएमच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सामान्यांना उपचार व सुविधा देण्यात यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील केवळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांचेच एकमेव पद भरलेले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहायक संचालक कुष्ठरोग अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांना मूळ पदभार सांभाळून हा अतिरिक्त पदभार सांभाळताना कामाचा ताण येत असल्याचे सांगण्यात आले. असाच प्रकार ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांना आढावा, तर आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा देण्यात आला होता. त्यांनी रिक्त पदे भरण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिलेले आहे. याबाबत जाहिरातही काढली. परंतु याची कारवाई अतिशय संथ गतीने सुरू आहे.

कोट

ग्रामीण आरोग्य विभागात रिक्त पदांचा आकडा मोठा आहे, हे खरे आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना अडचणी येत आहेत. तसेच आहे त्यांच्यावरही कामाचा ताण वाढत आहे. असे असले तरी कोरोना काळात आहे त्याच मनुष्यबळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविल्या होत्या. रिक्त पदांबाबत वरिष्ठांना कळविलेले आहे.

डॉ.आर.बी.पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र - ५२

आरोग्य उपकेंद्र - २९७

Web Title: Rural Health Department ‘sick’; 433 posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.