गव्हाणथडी वाळू ठेक्यावर नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:48+5:302021-04-05T04:29:48+5:30

माजलगाव : तालुक्यातील गव्हाणथडी येथे आठ दिवसांपूर्वी शासनाने लिलाव केलेला वाळू ठेका सुरू झाला असून त्या ठिकाणी ...

Rules trampled on wheat sand contract | गव्हाणथडी वाळू ठेक्यावर नियमांची पायमल्ली

गव्हाणथडी वाळू ठेक्यावर नियमांची पायमल्ली

माजलगाव : तालुक्यातील गव्हाणथडी येथे आठ दिवसांपूर्वी शासनाने लिलाव केलेला वाळू ठेका सुरू झाला असून त्या ठिकाणी मजुरांकडून वाळू उपसा करण्याऐवजी चक्क जेसीबीने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात वाळू पट्ट्यांचे शासनाने लिलाव न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला. महसूल प्रशासन व पोलीस खात्यातील लोकांना हाताशी धरून संगनमताने चोरट्या पद्धतीने वाळू उपसा , चोरी आणि वाहतूक सुरूच होती. शासनाचा महसूल बुडत असताना देखील प्रशासनातील काही अधिकारी वाळू घाटांचा लिलाव करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील एकूण २१ वाळू ठेक्यांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये गेवराई तालुक्यातील १८, परळीमधील एक व माजलगाव तालुक्यातील दोन वाळू ठेक्यांचे लिलाव करण्यात आले.

माजलगावच्या संबंधित ठेकेदाराने वाळू पट्टा सुरू केला, मात्र तेथे शासनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. रोजंदारी कामगारांमार्फत वाळू उपसा करण्याचे शासनाचे नियम असताना या ठिकाणी चक्क जेसीबीच्या साह्याने उपसा सुरू आहे. संध्याकाळी सहा वाजता ठेका बंद करणे आवश्यक असतांना रात्रंदिवस उपसा होत आहे.

अगोदरच कोरोना महामारीमुळे प्रत्येक गावातील मजुरांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार मिळावा यासाठी या वाळू ठेक्यावर काम देणे आवश्यक आहे. मात्र कागदोपत्री मजूर दाखवायचे व प्रत्यक्ष मजुरांना काम न देता गव्हाणथडी गावातील ठेक्यावर जेसीबी यंत्रे लावून गोदावरी नदी पात्रातून खोलवर असा वाळू उपसा करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या हायवा टिप्परमध्येही नियमबाह्यरित्या क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरण्यात येत आहेत. परिणामी तब्बल वीस किलोमीटरचे रस्ते खचून तडे जात आहेत. तर गोदावरी नदीपात्रातून अवजड वाहने कच्च्या रस्त्याने येत असल्याने प्रचंड धूळ उडत असून ही धूळ शेतातील पिकावर बसत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. ठेका सुरू होताच ठेकेदारांकडून महसूल विभागाला हाताशी धरून सर्व नियम गुंडाळून ठेवत वाळू उपसा सुरू करण्यात आल्याने याची प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ स्तरावरून दखल घ्यावी अशी मागणी या गावातील नागरिकांतून होत आहे.

------

तालुक्यातील दोन वाळू ठेक्यास शासनाने मंजुरी दिली असून हे दोन्ही ठेके सुरू करण्यात आले असून या ठिकाणावरून नियमबाह्य उपसा व वाहतूक सुरू असेल तर याचा अहवाल मागवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

---- वैशाली पाटील , तहसीलदार माजलगाव

Web Title: Rules trampled on wheat sand contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.