टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी
By सोमनाथ खताळ | Updated: September 7, 2022 18:40 IST2022-09-07T18:40:16+5:302022-09-07T18:40:40+5:30
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर तडकाफडकी कारवाई

टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रबरी शिक्के लावून बायोमेट्रिकवर हजेरी लावल्याचा प्रकार समोर आला होता. याच प्रकरणात खाजगी कंपनीचा रक्त संकलन तंत्रज्ञाला बडतर्फ केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनंतर कंपनीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता डॉक्टर, कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
टाकरवण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर नसतानाही त्यांची बायोमेट्रिक हजेरी लागली होती. ही बाब संशयास्पद आढळल्याने १ ऑगस्ट रोजी खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते व माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम यांनी टाकरवणला भेट दिली. यावेळी डॉ.चंदाराणी नरवडे या परवानगी घेऊन गेल्या होत्या, तर डॉ.आकाश राठोड हे गैरहजर होते. याचवेळी डॉ.गिते व डॉ.कदम यांनी लिपीक, शिपाई आणि खाजगी कंपनीच्या रक्त संकलन तंत्रज्ञाची चौकशी केली असता त्यांनी काही पुरावे दिले. तसेच कबुलीही दिली. यात एक प्रयोगशाळा तंत्रज्ञही असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारावरून डॉ.गिते यांनी कंपनीच्या जिल्हा समन्वयकांना हा प्रकार कळविला. त्यावरून जिल्हा समन्वयक राहुल तिडके यांनी तंत्रज्ञ अनिल कसपटे याला बडतर्फ केले आहे. या कारवाईने इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
डॉक्टर, कर्मचारीही रडारवर
रबरी शिक्का प्रकरणात तंत्रज्ञाच्या रूपाने पहिली विकेट गेली आहे. परंतू अद्यापही याच आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांबाबतही काही पुरावे हाती लागलेले आहेत. त्याच अनुषंगाने त्यांच्यावरही कारवाई होणार असून ते सर्व रडारवर आहेत. त्यांच्या कारवाईचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टाकरवण आरोग्य केंद्रातील रक्त संकलन तंत्रज्ञ अनिल कसपटे यांच्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तक्रार केली होती. तसेच वेळेतीन अनियमितता, रोज उशिरा जाणे, रूग्णांमध्ये दुरावा निर्माण करणे आदी मुद्यांचा ठपका ठेवून टर्मिनेट केले आहे.
- राहुल तिडके, जिल्हा समन्वयक, एचएलएल बीड