माजलगाव शहर व ग्रामीणच्या विकासाची दोर पती-पत्नीच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:35+5:302020-12-27T04:24:35+5:30
माजलगाव : तालुका व शहराच्या विकासाचे केंद्र असणाऱ्या पंचायत समिती व नगर परिषद कार्यालयांना मागील अनेक वर्षांपासून ...

माजलगाव शहर व ग्रामीणच्या विकासाची दोर पती-पत्नीच्या हाती
माजलगाव : तालुका व शहराच्या विकासाचे केंद्र असणाऱ्या पंचायत समिती व नगर परिषद कार्यालयांना मागील अनेक वर्षांपासून कायम अधिकारी नव्हता. आता या दोन्ही कार्यालयांना आता कायमस्वरूपी अधिकारी मिळाले असून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून प्रज्ञा माने-भोसले तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे रूजू झाले आहेत. हे दोघे अधिकारी पती-पत्नी असल्याने तालुका व शहराच्या विकासाची दोर आता त्यांच्या हाती असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
माजलगाव नगर परिषदेला एक वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. दैनंदिन कामेच होत नसल्याने विकासात्मक कामे तर दूरच होती. दुसरीकडे ग्रामीण विकासाचे केंद्र पंचायत समितीला कर्तबगार अधिकारी नव्हते. त्यामुळे पंचायत समितीचा कारभारही ढेपाळला होता. ग्रामसेवक व अधिकाऱ्यांची मनमानी दिवसेंदिवस वाढत होती. दोन महिन्यांपूर्वी माजलगाव पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून प्रज्ञा माने-भोसले यांची नेमणूक झाली.तर दुसरीकडे भ्रष्टाचार व तीन मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने माजलगाव नगर परिषदेत येण्यास कुणी अधिकारी धजावत नव्हता. परंतु याला अपवाद ठरत तीन-चार महिन्यांपासून विशाल भोसले यांनी प्रभारी कारभार पाहिला. पंचायत समिती व नगर परिषदेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे नेमणूक झालेले पती-पत्नी अधिकारी मिळाले. ते कितपत विकास योजना प्रभावी राबवतात, याबाबत नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे.
पंचायत समितीमध्ये शिस्त
प्रज्ञा माने- भोसले यांनी पं.स.च्या ढेपाळलेल्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी पाऊले उचलली. कामे नसतांना पं.स.आवारात फेरफटका मारणाऱ्या ग्रामसेवकांना नोटिसा बजावल्या. त्यांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ग्रामसेवकांची रिकाम-टेकडी रेलचेल पं.स.आवारात बंद झाली. तसेच कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहू लागल्याने पैसा व अडवणूक न होता नागरिकांची कामे सरळ होऊ लागली.
प्रभारी ते कायमस्वरूपी
विशाल भोसले यांनी नियमानुसार स्वच्छता, पाणी पुरवठा आदी महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात निविदा काढून प्रश्न मार्गी लावले. मालमत्ताधारकांना कर आकारणी नोटिसा बजावून त्याची अंमलबजावणीची कार्यवाही चालू केली. परंतु प्रभारी कारभार असल्याने कामकाजासाठी म्हणावा तसा वेळ देता येत नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांची नगर विकास विभागाने माजलगाव नगर परिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नेमणूक केली.