थेट सेवा समाप्तीच्या कारवाईवरून रोहयोचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:42+5:302021-07-11T04:23:42+5:30
बीड : रोहयोत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शिरूर कासार, गेवराई पंचायत समितीतील एका सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यासह दोन क्लार्क कम डेटा इन्ट्री ...

थेट सेवा समाप्तीच्या कारवाईवरून रोहयोचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक
बीड : रोहयोत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शिरूर कासार, गेवराई पंचायत समितीतील एका सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यासह दोन क्लार्क कम डेटा इन्ट्री ऑपरेटर विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ८ जुलै रोजी थेट सेवा समाप्तीची कारवाई केली. सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप करत जिल्ह्यातील रोहयोचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले असून, १० जुलै रोजी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची लाचेची मागणी पूर्ण करू न शकल्याने कारवाई केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने रोहयो अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे आमचे काम सुरू असते; परंतु यात ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, सहायक लेखाधिकारी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका असते. ते अनियमिततेस जबाबदार असूनही त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई न करता केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोषी धरले जाते. असाच प्रकार शिरूर व गेवराई पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांसोबत घडला. विशेष म्हणजे सेवा समाप्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असूनही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच कारवाई केल्याचा दावा केला आहे. तीन कर्मचाऱ्यांविरोधातील सेवा समाप्तीच्या आदेशाला स्थगिती द्यावी. तसेच यापुढे कारवाई करताना केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोषी धरू नये आणि आस्थापनेची सर्व कारवाई जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करावी या मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी कारवाई न झाल्यास २१ जुलैपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
उपासमारीची वेळ
कर्मचाऱ्यांचे ८ महिन्यांचे मानधन थकीत आहे. त्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे थकीत व वाढीव मानधन द्यावे. रखडलेली मुदतवाढ देखील द्यावी. ५० कि.मी.च्या आत बदली करावी, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
लाच मागणारा अधिकारी कोण?
कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने लाच मागितली. याबाबत भ्रमणध्वनीवर बोलल्याची रेकॉर्डिंग व चॅटिंगचे स्क्रीनशॉट आहेत; परंतु नामोल्लेख निवेदनात टाळण्यात आला आहे. त्यामुळे लाचेची मागणी करून पिळवणूक करणारा अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.