कडेकोट पोलीस बंदोबस्तात वैद्यनाथ मंदिराचे रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:11+5:302021-03-13T04:59:11+5:30
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद ...

कडेकोट पोलीस बंदोबस्तात वैद्यनाथ मंदिराचे रस्ते बंद
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवून मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात जाता आले नाही व मंदिर पायरीचे दर्शनसुद्धा घेता आले नाही.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने येथील यात्रा महोत्सव रद्द करून ८ ते १६ मार्च दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात एकही भाविक जाता कामा नये, या दृष्टीने पोलीस प्रशासनाने उपाय योजना केली आहे. परळी शहर पोलीस ठाणे ते वैद्यनाथ मंदिर रोड यादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात व मंदिराच्या पायऱ्याजवळसुद्धा जाता आले नाही. मेरूप्रदक्षिणा मार्गावर मात्र भाविक सकाळपासून येत जात होते. येथील वैद्यनाथ मंदिर जवळील श्री संत जगमित्र नागा मंदिर पायऱ्याचे दर्शन घेऊन भाविकांनी समाधान मानले.
महाशिवरात्रीच्या पुण्य पूर्वकाळात वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याचे दर्शन घेता येईल, असे वाटले होते परंतु चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मंदिराच्या पायऱ्याचे दर्शन घेण्यासाठी जाता आले नाही -गणेश बद्दर, भाविक परळी वैजनाथ.
सकाळपासून भाविक वैद्यनाथ मंदिराकडे येऊ लागले होते परंतु त्यांना नेहरू चौकाजवळून परत जावे लागेल, महाशिवरात्री दरम्यान होणारा यात्रा महोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसरात एकही स्टॉल उभारला गेला नाही. त्यामुळे मंदिर रोडवर शांतता होती. दर महाशिवरात्रीला भाविकांच्या गर्दीने फुलून जात होता. परळी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मात्र या रस्त्यावर स्वच्छतेची सकाळी कामे केली व रस्ता स्वच्छ ठेवला.
===Photopath===
110321\img-20210311-wa0568_14.jpg~110321\img-20210311-wa0386_14.jpg
===Caption===
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवून मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात जाता आले नाही व मंदिर पायरीचे दर्शन सुद्धा घेता आले नाही.