पाईपलाईनच्या नावाखाली गावांतर्गत रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:49+5:302021-06-27T04:21:49+5:30
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या चोथेवाडी ता. अंबाजोगाई येथे पूर्वीची पाणीपुरवठा पाईपलाईन असतानाही नवीन पाईपलाईन टाकली खरी, मात्र त्यासाठी ...

पाईपलाईनच्या नावाखाली गावांतर्गत रस्ता उखडला
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या चोथेवाडी ता. अंबाजोगाई येथे पूर्वीची पाणीपुरवठा पाईपलाईन असतानाही नवीन पाईपलाईन टाकली खरी, मात्र त्यासाठी गावांतर्गत असलेला सिमेंट रोड पूर्णपणे ध्वस्त करून टाकल्याने ग्रामस्थांना वाहन घेऊन जाणे तर सोडाच, साधे चालणेही अवघड झाले आहे. पूर्वीची नळ पाईपलाईन असताना पुन्हा रस्ता खोदून पाईपलाईन का टाकली, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
चोथेवाडी येथे पूर्वीची पाण्याची पाईपलाईन मुरंबी फाटा येथील पाण्याच्या टाकीपासून आहे. अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांनी नवीन मोठी पाण्याची टाकी बांधण्याची मागणी अनेकदा केलेली आहे. असे असताना नवी पाईपलाईन टाकून साध्य काय झाले, असा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरज नसताना पाईपलाईन टाकली तीही रस्त्याच्या माध्यभागातून त्यात संपूर्ण सिमेंट रस्ता उखडून टाकला. त्यातच पाणी सोडण्यासाठी टाकलेले वॉलचे पाईप उंच काढण्यात आल्याने चालायचे कसे, वाहन कसे घेऊन जायचे असा प्रश्न पडला आहे. वास्तविक पाहता पाईपलाईन रस्त्याच्या कडेने असते याचे भानही ठेवण्यात आले नाही. त्यातच रस्त्याचे मात्र तीनतेरा वाजवून टाकले आहेत. गरज नसताना पूर्वी इतक्याच व्यासाची पाईपलाईन का केली हा प्रश्न असून याची तत्काळ चौकशी करून रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी बाबूराव जाधव, अंबाजोगाई बाजार समितीचे संचालक ॲड. इंद्रजित निळे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
सिमेंट रस्ता फोडला
पूर्वीची नळ पाईपलाईन फक्त अडीच इंच व्यासाची आहे आणि पुन्हा नवी पाईपलाईनसुद्धा अडीच इंच व्यासाचीच गाडण्यात आली आहे. सर्वात कहर म्हणजे दोन गल्लीत टाकलेली पाईपलाईन सिमेंट रस्ता फोडून भर मध्यभागातून टाकल्याने संपूर्ण रस्ताच उखडला आहे. त्यामुळे चार चाकी वाहन, मोटारसायकल तर सोडाच गुरेढोरे, महिला, बालक, ग्रामस्थांना साधे चालणेही कठीण झाले आहे.
सीईओंना कळविले
या संदर्भात चोथेवाडी येथील ग्रामविकास अधिकारी डी. एच. भोसले यांना विचारले असता रस्ता उखडल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन तत्काळ रस्ता दुरुस्तीबाबत मार्गदर्शन मागविल्याचे सांगितले.
===Photopath===
260621\img-20210401-wa0003.jpg
===Caption===
पाईपलाईनच्या नावाखाली चोथेवाडी येथील रस्ता उखडला .