रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:39+5:302021-03-08T04:31:39+5:30
सुपीकतेला धोका अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु, या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व ...

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
सुपीकतेला धोका
अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु, या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ग्राहकांची लूट
अंबाजोगाई : शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेअंतर्गत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांमधून सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. ग्राहकसेवा केंद्राकडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात बँकांनी दक्षता बाळगावी व ग्राहकांची लूट थांबवावी, अशी मागणी बँकेचे ग्राहक, नागरिकांमधून होत आहे.
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगार निर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गाव रस्ते, शिवरस्ते यांची कामे सुरू केली तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्धतेची मागणी होत आहे.
दुभाजकातील झाडे बहरली
बीड : शहरातील दुभाजकांमध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून, शहरात ती सुशोभित दिसू लागली आहे. या झाडांना नियमित पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने वाढ चांगलीच होत आहे. मात्र, कटई करण्याचीदेखील गरज आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीतील झाडे काढून स्वच्छतेची मागणी होत आहे.
गतिरोधक बसवा
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांच्या संसारात व्यसनाधीनतेमुळे कलह वाढत चालले आहेत.