रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:31+5:302021-02-05T08:29:31+5:30
विषाणूजन्य आजाराने उपचारास गर्दी अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या ...

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
विषाणूजन्य आजाराने उपचारास गर्दी
अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे बालके, वयोवृद्ध नागरिक यांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे. सध्याच्या हवामानातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
दिवसा वीज देण्याची मागणी
बीड : रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत.
टाकरवण परिसरात खड्ड्यांतून ऊस वाहतूक
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवण फाटा - राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या भागात उसाची लागवड जास्त असते. सध्या ऊसतोडणी सुरू असून, याच खड्ड्येमय रस्त्यांवरून वाहने ऊस वाहतूक करीत आहेत. या रस्ता दुरुस्तीबाबत मागणी करूनही याकडे दुर्लक्ष आहे.
बसची मागणी
बीड : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक महिने बस बंद होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत; परंतु आजही अनेक गावांमध्ये बस धावत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जात असले तरी सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.
गस्त वाढवावी
बीड : शहरातील बाजारपेठा सध्या खरेदीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी गजबजून गेल्या आहेत. याच गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोरही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. या चोरांवर अंकुश राहील, नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.
अशुद्ध पाणीपुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
स्वच्छतागृह अस्वच्छ
बीड : शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
महामार्गाचे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याकडेला असलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.