धारूर घाटात रस्ता उंचीचे काम सुरू; पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक दोन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST2021-01-13T05:28:08+5:302021-01-13T05:28:08+5:30
धारूर : धारूर-तेलगाव रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावात जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरच खडी फोडून ...

धारूर घाटात रस्ता उंचीचे काम सुरू; पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक दोन तास ठप्प
धारूर : धारूर-तेलगाव रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावात जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरच खडी फोडून काम सुरू असल्याने वाहनांना अडथळा होत असून, रविवारी रात्री दोन तास वाहतूक ठप्प होती, तर सोमवारी सकाळच्यावेळी पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती.
एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी वैतागून गेले असून, पर्यायी रस्ता करूनच रस्ता उंची वाढविण्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
धारुर शहरानजीक घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी खामगाव-पंढरपूर रस्त्यावर आरणवाडी साठवण तलावातील बुडित क्षेत्रात रस्त्याची उंची वाढविण्याचे काम चार महिन्यांपासून संथगतीने चालू असून, सध्या गुत्तेदाराने रस्त्यावर विहिरीचे खरपण टाकून फोडत असल्याने रस्ता अर्धा बंद असल्यामुळे रस्त्यावर तासन्तास वाहतूक बंद पडत आहे. वास्तविक तात्पुरता बाह्यवळण रस्ता करून काम करणे गरजेचे आहे. मात्र औरंगाबाद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जाधव यांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
याप्रश्नी पाहणी करून संबंधितांना कडक सूचना देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुधीर शिनगारे यांनी केली आहे. रविवारी रात्री या रस्त्यामुळे तब्बल दोन तास घाटात तेलगाव रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळच्यावेळी दीड ते दोन तास वाहतूक ठप्प होती. रोजच्या या त्रासाने वाहनधारक व प्रवासी बेजार झाले होते. तत्काळ पर्यायी रस्ता करावा व मगच या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे