अवैध वाळू उपश्यामुळे नदीपात्राचे वाटोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:33+5:302021-03-13T04:58:33+5:30
कडा : अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राचे वाटोळे झाले असून मोठे खड्डे पाडले जात आहेत. महसूल विभागाने ...

अवैध वाळू उपश्यामुळे नदीपात्राचे वाटोळे
कडा : अवैध वाळू उपसा होत असल्याने नदीपात्राचे वाटोळे झाले असून मोठे खड्डे पाडले जात आहेत. महसूल विभागाने सुरवातीला वाळू उपसा करणाऱ्यांना आळा घातला होता. पण आता पोलीस व महसूल विभागाचा वचक नसल्याने दोघांच्याही नाकावर टिच्चून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रात्री अपरात्री खुलेआम वाळू उपसा होत आहे. बीडच्या पोलिसांना येथे येऊन कारवाई करावी लागते मग स्थानिक प्रशासन करतंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात अनेक वेळा कारवाईसाठी गेलेल्या पथकाला अरेरावी, वाहने पळविणे, धमकावणे, बोट किंवा वाहने पळविणे अशा घटनांना सामोरे जावे लागते. एवढेच नाहीतर वाळू माफियांकडून मनात रोष धरून लोकांना मारहाण देखील झाली. असे असताना वाळू उपसा व वाहतुकीला लगाम घालणे गरजेचे होते. मात्र १०० किलोमीटर अंतरावरून येऊन विशेष पोलीस पथकाचे अधिकारी, कर्मचारी कारवाई करत असतील आणि स्थानिक प्रशासनाला हेच दिसत नसतील तर याला काय म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष घालून विनापरवाना अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय खंडागळे यांनी केली आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्री, पहाटे टॅक्टर, टिप्परमधून मोठा वाळू उपसा केला जात आहे. मागे थोडे दिवस कारवाया झाल्या. पण आता दुर्लक्ष का होत आहे, हे समजण्यास मार्ग नाही. याबाबत आष्टीचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विचारणा केली असता वाळू चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.