तालुक्यातील मंजरथ येथील महिला सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश रद्द करून आनंदगावकर यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याची कार्यवाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
नुकतेच ढोरगाव येथील सरपंच यमुना सरवदे या अपात्र ठरल्या होत्या व आता आनंदगावकर या देखील अपात्र ठरल्याने दोन महिला सरपंच घरी बसल्या आहेत.
माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे सरपंच म्हणून एरोनॉटिकल इंजिनिअर असलेल्या ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या मागील काही वर्षापासून काम पाहतात. त्यांच्या कारभाराविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ राजेभाऊ चुंबळे यांनी आनंदगावकर यांना अपात्र ठरवावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.
या अहवालामध्ये मंजरथ हे गाव धार्मिक स्थळ असल्याने या गावात येणाऱ्या वाहनांकडून वसुलीची रक्कम बँकेत भरणा न करणे, रोजंदारीवर मजुरांना रोख रक्कम देणे, सरपंच यांनी कोविडसाठी तीन लाख रुपये खर्च केले असे दाखवले, १४ व्या वित्त आयोगातील रमाई योजना कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत, १४ सप्टेंबर १९ व ऑक्टोबर १९ या सभेच्या इतिवृत्तावर ग्रामसेवक व सरपंच यांची सही नाही, तर गैरहजर असलेले सदस्य बाळू काळे व रघुनाथ चुंबळे यांची नावे सूचक, अनुमोदक अशी दाखवण्यात आली आहेत, असे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी २३ जून २० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावणी घेतली. यावेळी सरपंच गैरहजर असल्याने त्यांचेविरुद्ध अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १६ जुलै २० रोजी विभागीय आयुक्तांना सादर केला.
याबाबत १ जानेवारी २१ रोजी अप्पर विभागीय आयुक्त यांच्या चौकशीत सरपंच, ग्रामसेवक यांनी सर्व कागदपत्रे सादर केल्याचे दिसून आले तसेच या प्रकरणात ठोस कारण असल्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल स्वीकारणे आयुक्तांना बंधनकारक नाही. या बाबी विचारात घेता आयुक्तांनी ३९-१ चा अर्ज नामंजूर केला होता. यावर रघुनाथ चुंबळे यांनी थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन सरपंचांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध होते म्हणून अप्पर विभागीय आयुक्तांचे आदेश रद्द करून सरपंच ऋतुजा आनंदगावकर यांना अपात्र ठरवल्याचे आदेश ४ मार्च रोजी बजावण्यात आले आहेत. ही ऑर्डर ९ एप्रिल २१ रोजी मिळाली.