धोका वाढला; बाधितांची शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:54+5:302021-03-07T04:30:54+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी तर रेकॉर्डब्रेक करीत नव्या रुग्णांनी शतक ओलांडले. शनिवारी नवे ...

धोका वाढला; बाधितांची शंभरी पार
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी तर रेकॉर्डब्रेक करीत नव्या रुग्णांनी शतक ओलांडले. शनिवारी नवे १०८ रुग्ण आढळले, तर बीड व गेवराईतील दोघांचा बळीही गेला. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण रोजच वाढत चालले आहेत. प्रशासनाने दाेन दिवसांपूर्वीच वाढता संसर्ग पाहता गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार व कोचिंग क्लासेसवर निर्बंध घातले आहेत. असे करूनही लोक विनाकारण गर्दी करून कोरोना नियम पायदळी तुडवीत असल्याचे दिसत आहे. शनिवारीही जिल्ह्यातील ९२४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ८१६ अहवाल निगेटिव्ह आले, तर १०८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ८, आष्टी ७, बीड ४३, गेवराई २१, केज ४, माजलगाव ८, परळी ८, पाटोदा ५, शिरुर १ आणि वडवणी ३ यांचा समावेश आहे. तसेच शनिवारी दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्युदरही कमी होत नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मृत्यूला ब्रेक लागल्यानंतर शनिवारी आणखी दोन मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाले. यात बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील ८० वर्षीय पुरुष आणि गेवराई तालुक्यातील देवकी येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
आकडेवारी
एकूण रुग्णसंख्या १९२२४
एकूण काेरोनामुक्त १८२३८
एकूण मृत्यू ५८७