उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:48+5:302021-01-04T04:27:48+5:30
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा ...

उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहीत्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसविण्याची मागणी होत आहे.
अडथळ्यांमुळे वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न. प. च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
तलाठी सज्जावर दिसेना ; कामे खोळंबली
गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळखात असून याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सज्जावर तलाठी राहत नसल्याने कामे होईनासे झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
अवैध धंदे जोमात ; नियंत्रणाची मागणी
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
रस्ता दुरूस्ती करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून हा रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.