केज : दंड कमी करण्यासाठी जप्त केलेल्या हायवामधील वाळू काढून टाकल्यानंतर वाळूची फेरतपासणी करण्याची मागणी वाळू माफियाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर फेरमोजणी केली असता टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.
माजलगाव येथून अंबाजोगाईकडे गंगेची वाळू घेऊन जाणारा टिप्पर (एमएच ४४ यू १३१०) २६ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान केजचे मंडळ अधिकारी भागवत पवार व तलाठी लहू केदार यांनी पकडला होता. त्यातील वाळूचे मोजमाप केले असता त्यामध्ये गौण खनिज वाहतूक परवान्यापेक्षा अधिकची वाळू आढळून आली. ५.७३ ब्रास वाळू मिळून आल्याने चार लाख १७ हजार ९६३ रुपयांची दंड आकारणी करण्याचा अहवाल तहसीलदारांना सादर केला होता व टिप्पर केज तहसील कार्यालयात लावला होता.
दरम्यान, या टिप्परमधून वाळू काढून ती तहसील कार्यालयातील वाळूच्या ढिगावर टाकण्यात आली. नंतर टिप्परमध्ये पाच ब्रासपेक्षा कमी वाळू असल्याचा दावा करीत वाळूची फेरमोजणी करण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी या टिप्परमधील वाळूची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी भागवत पवार व तलाठी लहू केदार यांनी बुधवारी (दि. २) वाळूची फेरमोजणी केली. या टिप्परमधील वाळू ५.१८ ब्रास भरल्याने ती पूर्वीपेक्षा अर्धा ब्रास कमी भरली आहे. दरम्यान, टिप्परमधून वाळू काढून ती तहसील कार्यालयातील वाळूच्या ढिगावर टाकली असल्याबाबतचा अहवाल मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
पाऊण फूट काढली वाळू
सुरुवातीला मोजली असता ५.७३ ब्रास वाळू होती. ती दुसऱ्या वेळेला मोजली असता ५.१८ ब्रास भरली. टिप्परमधून काढलेली वाळू लगतच्या वाळूच्या ढिगावर टाकण्यात आली आहे. याबाबत पूर्वी केलेला दंड ठेवणे योग्य असल्याचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. वाळूजप्तीची कारवाई केल्यावर आमचेही कर्मचारी सहकार्य करीत नसल्याची खंत मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी व्यक्त केली.
वाळू कमी करण्यास कोणी मदत केली?
तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्या निवासस्थानाला खेटून उभा केलेल्या टिप्परमधून वाळू कमी करण्यासाठी वाळू माफियाला कोणी मदत केली, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
फोटो क्रमांक १) बुधवारी टिप्परमधील वाळूची मोजणी करण्यात आली. २) त्याआधी टिप्परमधील काढण्यात आलेली वाळू लगतच्या ढिगाऱ्यावर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
===Photopath===
030621\deepak naikwade_img-20210603-wa0025_14.jpg~030621\deepak naikwade_img-20210603-wa0007_14.jpg