‘रेमडेसिविर’साठी नातेवाइकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:41+5:302021-04-12T04:31:41+5:30
बीड : जिल्ह्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. कोरोनाबाधितांसह संशयितांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नातेवाइकांना धावपळ ...

‘रेमडेसिविर’साठी नातेवाइकांची धावपळ
बीड : जिल्ह्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. कोरोनाबाधितांसह संशयितांना हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. तर औषधी उपलब्ध करून देण्यास जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. यात सामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला औषधी अपुऱ्या पडताना दिसत आहेत. यत रेमडेसिविर इंजेक्शनचा जास्त तुटवडा जाणवत आहे. बाधित आणि संशयित रुग्णांना हे इंजेक्शन जास्त लाभदायक ठरत असल्याचे सांगितले जात असल्याने मागणीही वाढली आहे. मागील आठवड्यापासून तर हे इंजेक्शन मिळविण्यासाठी खूपच धावपळ करावी लागत आहे. असे असतानाही ते मिळत नाही. रविवारी तर जिल्ह्यात इंजेक्शनच उपलब्ध नव्हते. औषध प्रशासनाकडे मागणी केल्यावर सोमवारचा मुहूर्त सांगण्यात येत होता. यात सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जिल्हा प्रशासन मात्र तुटवडा आहे, असे सांगून हात झटकत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या क्रमांकावर करा संपर्क
रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही औषध प्रशासनाची आहे. येथील औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता आपण ७८७५९०८१०५ हा क्रमांक सामान्यांसाठी दिल्याचे सांगितले. ज्यांना रेमडेसिविर अथवा इतर औषधांसंदर्भात तक्रार असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोट
सध्या सर्वत्रच रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. सोमवारी जवळपास २५० इंजेक्शन उपलब्ध होतील. १५ तारखेनंतर आणखी इंजेक्शन येतील. रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरूच आहेत. खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांना औषधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तेथील मेडिकलची आहे.
- रामेश्वर डोईफोडे, औषध निरीक्षक, बीड