नियमित योगास योग्य आहाराची जोड आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:46+5:302021-06-25T04:23:46+5:30
बीड : येथील महिला कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष आणि गृहविज्ञान विभागाच्या संयुक्त ...

नियमित योगास योग्य आहाराची जोड आवश्यक
बीड : येथील महिला कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष आणि गृहविज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने योगानुभव आणि योगा संकल्प ऑनलाइन कार्यक्रम आणि प्राचार्य डॉ. सविता शेटे यांचे ‘महिला आणि योग’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गीताने झाली.
डॉ. सविता शेटे यांनी सहभागींना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले. योग म्हणजे मन, मेंदू, शरीर एका धाग्यात जोडणे होय. योग हे एक शास्त्र आहे. आपल्याकडे यावर बरेच जण अभ्यास करतात; परंतु आपल्यापेक्षाही परदेशात यावर जास्त अभ्यास केला जातो. योगाची आठ अंगे आहेत. योगामधील प्रत्येक आसनाची शास्त्रीय माहिती सहभागींना देऊन याचा फायदा मानवी शरीरासाठी कसा होतो हे त्यांनी सोदाहरण सांगितले.
विद्यार्थिनी मेघा घरत, ललिता कांबळे, ऐश्वर्या औसरमल यांनी योग दिनाबद्दल मनोगत संकल्प आणि योगा करून आलेले अनुभव सांगितले. तसेच सहा. प्रा. डॉ. सुनंदा आहेर, डॉ. अर्चना वाघमारे, ज्योती मगर, डॉ. रवींद्र ढास यांनी स्वानुभव तसेच कोरोना कालावधीत कुटुंबीयांनी कोरोना झाल्यानंतर योगामुळे त्यांना आलेला सकारात्मक परिणाम, योगा दिनानिमित्त केलेला संकल्प सांगितला.
सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता विकास हमी कक्षच्या समन्वयक डॉ. संध्या आयस्कर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थिनी, सहा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. वर्षा कुलकर्णी, गृहविज्ञान विभाग यांनी आभार प्रदर्शन केले.