लेखी हरकतीनंतरही खरेदीखताचा फेर मंजूर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:23+5:302021-02-05T08:24:23+5:30
शिरूर कासार : खरेदीखताचा फेर मंजूर करू नये, अशी लेखी हरकत घेऊन देखील फेर मंजूर केल्याप्रकरणी पाडळी येथील एका ...

लेखी हरकतीनंतरही खरेदीखताचा फेर मंजूर - A
शिरूर कासार : खरेदीखताचा फेर मंजूर करू नये, अशी लेखी हरकत घेऊन देखील फेर मंजूर केल्याप्रकरणी पाडळी येथील एका कुटुंबाने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून, अद्याप दखल घेतली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी समाधान बापूराव इंगळे व नारायण प्रभाकर हंगे यांनी गट नंबर ३३३, ३३४ व ७४८ चा खरेदीचा फेर मंजूर करू नये, अशी लेखी हरकत घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांना ११ जानेवारीस निवेदन दिले होते. यापूर्वी २४ डिसेंबर २०२० रोजी गाव कामगार तलाठी पाडळी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, अर्जाचा विचार न करता ५ जानेवारी रोजी फेर मंजूर करून खरेदीदाराच्या नावे ७/१२ व ८ अ वर नोंदी घेतल्या गेल्या.
तक्रार अर्जाचा विचार न करता तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन न घेता महसुली अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी तलाठी व मंडल अधिकारी यांची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करत धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा चौथा दिवस मावळला. आंदोलनाला दाद न दिल्यास उपोषण करावे लागेल. परिणामाला महसुली विभाग जबाबदार राहील, असे समाधान इंगळे यांनी सांगितले.
तक्रारदारांनी मुदतीत तक्रार दिली नसल्याने फेर मंजूर झालेला आहे, याउपर आता तक्रारदारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करून दाद मागावी, असे प्रभारी तहसीलदार शिवाजी पालेवाड यांनी सांगितले.