रेल्वेची परीक्षा द्यावी की एमपीएससीची ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:36+5:302021-03-18T04:33:36+5:30
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी लोकसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा, या दोन्ही परीक्षा २१ मार्च रोजी ...

रेल्वेची परीक्षा द्यावी की एमपीएससीची ?
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी लोकसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा, या दोन्ही परीक्षा २१ मार्च रोजी रविवारी एकाच दिवशी होणार आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रावर ऑफलाईन पद्धतीने तर, रेल्वेकडून ‘नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी’ (एनटीपीसी) घेण्यात येणारी ही परीक्षा देखील ऑनलाईन, परंतु केंद्रावरच होणार आहे. बीड शहरातील १३ केंद्रांवर ३ हजार ९०० विद्यार्थी पूर्वपरीक्षा देणार आहेत. तर ३२ हजार २०८ जागांसाठी रेल्वेची परीक्षा आधीच जाहीर झालेली आहे. विद्यार्थी या दोन्ही परीक्षांची तयारी रात्रंदिवस करत आहेत. मात्र ‘एमपीएससी’ने १४ मार्च रोजी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढला आहे.
दरम्यान, एमपीएससी पूर्वपरीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले होते; तर अनेक जिल्ह्यात आंदोलनं देखील झाली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता दोन्ही परीक्षा २१ मार्च रोजीच होणार असल्याने परीक्षार्थींची तारांबळ उडाली आहे. या सगळ्या गोंधळात मागील दोन-तीन वर्षांपासून दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू, शेतकरी कुटुंबातील व हलाखीची परिस्थिती असलेल्या उमेदवारांच्या अडचणीत मात्र, वाढ झाली आहे. तर दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एका परीक्षेपासून वंचित रहावे लागणार आहे.
२१ मार्च रोजी दोन्ही परीक्षा होणार
३९०० एमपीएससीसाठी परीक्षार्थी
१३ परीक्षा केंद्रे
रेल्वेची परीक्षाही केंद्रावरच
दोन वर्षांपासून अनेक विद्यार्थी रेल्वेच्या एनटीपीसी या परीक्षेसाठी अर्ज करून तयारी करत आहेत. ही परीक्षा ३२ हजार २०८ जागांसाठी होणार असून, ती मागील महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने घेतली जात आहे. ही परीक्षा ऑलनाईन असली तरी, परीक्षा केंद्रावर जाऊनच द्यावी लागणार आहे.
केंद्रावर पोहोचणे अशक्य
अनेक उमेदवारांचे दोन्ही केंद्र वेगवेगळ्या शहरात आलेले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी परीक्षा होणार असल्यामुळे त्या केंद्रावर पोहोचणे अशक्य गोष्ट आहे. तर कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन असल्यामुळे त्याचा फटका देखील परीक्षार्थींना बसण्याची शक्यता आहे.
काही जणांची रेल्वे परीक्षा झाली आहे
बीड जिल्ह्यात रेल्वे परीक्षेचे सेंटर नाहीत; मात्र रेल्वेची परीक्षा ही टप्प्याटप्प्याने झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची रेल्वे परीक्षा झालेली आहे. काहीजण राहिलेले असतील त्यांना मात्र या परीक्षांपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
महादेव जगताप, बीड
लॉकडाऊनचा फटका बसण्याची शक्यता
बीडमधील काही परीक्षार्थींचे एमपीएससीचे केंद्र औरंगाबाद व इतर शहरांमध्ये आहे; मात्र त्याठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांची गैरसोय होणार असून, प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांची केंद्रावर पोहोचण्यासाठी व्यवस्था करावी
राहुुल वायकर, संभाजी ब्रिगेड, माजी जिल्हाध्यक्ष
परीक्षा आहे त्याच तारखेला घ्यावी
राज्यसेवा पूर्वपरीक्षा यापूर्वी पाचवेळा पुढे ढकलली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर २१ मार्चला होणाऱ्या परीक्षेची मानसिकता परीक्षार्थींनी केली आहे. त्यामुळे याच तारखेला वेळेनुसार परीक्षा व्हावी हीच ईच्छा आहे.
विष्णू कचरे, परीक्षार्थी