रेल्वे प्रशासन खडबडून जागे, कडा येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:00+5:30
आष्टी : कडा शहराजवळून पाथर्डी बारामती रस्त्यावर नगर बीड परळी रेल्वेची क्रॉसिंग होत असून या मार्गाचे काम चालू असताना ...

रेल्वे प्रशासन खडबडून जागे, कडा येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव देणार
आष्टी : कडा शहराजवळून पाथर्डी बारामती रस्त्यावर नगर बीड परळी रेल्वेची क्रॉसिंग होत असून या मार्गाचे काम चालू असताना अपघाती वळण निर्माण झाल्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले होते. या अपघाताची दखल रेल्वे प्रशासन घेत नव्हते. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर रेल्वे प्रशासन जागे झाले असून कामाला लागले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा शहराजवळ नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जात असून औरंगाबाद, पाथर्डी ,कडा, मिरजगाव, बारामती या राज्य मार्गाला हा रेल्वेमार्ग क्रॉस करत आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने प्रशासनाने उड्डाणपूल करणे आवश्यक होते; परंतु उड्डाणपूल न करता धोकादायक असे वळण निर्माण झाल्याने या राज्यमार्गावर गेल्या महिनाभरात ५० पेक्षा जास्त लहान-मोठे अपघात झाले होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही याबाबत दखल घेतली गेली नाही. ही माहिती भाजपचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना दिली. खा. मुंडे यांनी तात्काळ दखल घेत दखल घेतली. कडा येथे रेल्वे क्रॉसिंगचा उड्डाणपूल होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटणार असल्याची ग्वाही देशमुख यांच्या भ्रमणध्वनीवरून खा. मुंडे यांनी दिली. यावेळी दिलीप पटवा, श्याम भोजने, राजू शिंदे, राजू म्हस्के, भाऊसाहेब भोजने, रवींद्र भोजने, संदीप नागरगोजे, महेश पवळ आधी कडा ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर-बीड-परळी रेल्वेचे प्रशासनिक अधिकारी व्ही. राज यांना भ्रमणध्वनीवरून तत्काळ कडा येथे जाऊन पाहणी करण्याचे सांगितले. त्यानंतर व्ही. राज यांनी सोलापूर रेल्वे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सिंग यांना स्थळपाहणी करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सर्व रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रस्ता रूंदीकरण तसेच दुभाजक व अपघात सदृश्य फलक लावण्याचे काम सुरू केले. यावेळी कडा येथील अनेक लोकांनी अधिकाऱ्यांकडे उड्डाणपुलाची मागणी केली. तर खा. मुंडे यांनी एस. के. सिंग यांना या ठिकाणी उड्डाणपूल होण्यासंदर्भात तत्काळ आपल्या स्तरावरून माहिती पाठविण्याचे निर्देश दिले.