एटीएममध्ये रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST2021-09-05T04:37:15+5:302021-09-05T04:37:15+5:30
-------- मास्क हेच प्रभावी औषध अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात ...

एटीएममध्ये रांगा
--------
मास्क हेच प्रभावी औषध
अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात व सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो. संभाव्य कोरोनाची लाट ओळखून शहरवासीयांनी दक्षता बाळगावी व मास्क हेच कोरोनावरील प्रमुख औषध समजून प्राधान्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.
---------
स्टेशनरी दुकानदार आले अडचणीत
अंबाजोगाई : यावर्षी अजूनही शैक्षणिक वर्ष सुरू न झाल्याने स्टेशनरी दुकानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन झाले. ऐन जून, जुलै या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालये बंद राहिली. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. तोपर्यंत स्टेशनरी दुकानदारांच्या व्यवसायाला गती येणार नसल्याने सध्या तरी स्टेशनरी दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
----------
जैविक कचरा रस्त्यावर
अंबाजोगाई : शहरात बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर आहेत. अनेक रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीतीने लावण्यात येत नसल्याने हा जैविक कचरा रस्त्यावर टाकला जातो. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. शहरातील अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या बाजूला असा कचरा दिसून येतो. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे अक्षय भूमकर यांनी केली आहे.
----------
शैक्षणिक कर्जातून सूट देण्याची मागणी
अंबाजोगाई : कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे, तर अनेकांचे व्यवसाय मंदावले आहेत. अशा स्थितीत ज्या पालकांनी शैक्षणिक कर्ज आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतले त्यांना आता हे कर्जाचे हप्ते भरणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. अशा स्थितीत शासनाने शैक्षणिक कर्ज घेतलेल्या कर्जदारांना व्याज माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.
----