घाटनांदूरच्या खरेदी केंद्रावर तेवीस हजार पाचशे सात क्विंटल विक्रमी हरभरा खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:53+5:302021-07-03T04:21:53+5:30
अंबाजोगाई तालुक्यात फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एफसीआयच्यावतीने स्थानिक संस्थांना हाताशी धरून हरभरा खरेदी करण्यात आली. यात घाटनांदूर ...

घाटनांदूरच्या खरेदी केंद्रावर तेवीस हजार पाचशे सात क्विंटल विक्रमी हरभरा खरेदी
अंबाजोगाई तालुक्यात फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एफसीआयच्यावतीने स्थानिक संस्थांना हाताशी धरून हरभरा खरेदी करण्यात आली. यात घाटनांदूर येथे आदित्य कृषी निविष्ठा या संस्थेच्यावतीने हरभरा नोंदणी व खरेदी करण्यात आली. नोंदणी सुरू केलेली असतानाही खुल्या बाजारात हरभरा भाव कमी-जास्त होत असल्याने सुरुवातीला नोंदणी कमी झाली. नोंदणीची मुदत संपत असताना शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. मुदत संपल्यानंतरही हजारो शेतकरी राहिल्याने अखेर कृऊबा सभापती गोविंद देशमुख, संस्थाध्यक्ष सत्यजित सिरसाट यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत प्रयत्न करून खरेदीसाठी नोंदणी मुदत वाढवून घेतली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शासनाचा शासकीय हमीभाव पाच हजार शंभर रुपये असून, घाटनांदूर व परिसरातील एक हजार सातशे शेतकऱ्यांचा तब्बल तेवीस हजार पाचशे सात क्विंटल हरभरा या खरेदी केंद्रावर खरेदी करून त्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांचा खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात हरभरा खरेदीत घाटनांदूरचे आदित्य कृषी निविष्ठा केंद्र अग्रस्थानी आले आहे .या संपूर्ण खरेदीसाठी देखरेख, प्रतवारी यासाठी एफसीआयच्यावतीने संदीप जांभळे, नारायण पाटील, बिन्नर आदींनी परिश्रम घेतले. एफसीआयच्यावतीने आदित्य कृषी निविष्ठेचे संस्थाध्यक्ष तथा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सत्यजित सिरसाट व सचिव प्रताप गित्ते यांचा विषेश प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत हमीभावाने हरभरा पिकास खुल्या बाजारापेक्षा चांगली किंमत मिळाल्याने चांगलाच आधार मिळाला आहे .