पंपाला वीज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:44+5:302021-02-08T04:29:44+5:30
वृक्षतोड थांबवा पाटोदा : तालुक्यातील अनेक भागामधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, ...

पंपाला वीज मिळेना
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागामधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, सॉ-मिल चालक मात्र मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. मात्र, परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. यावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.
बोंडअळीमुळे शेतकरी संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले. आता कापूस बहरात आला होता, तर कापसावर बऱ्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसावर हे नवीनच संकट आल्याने कापसाच्या उत्पादनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे.
पांदण रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील जेबापिंप्री येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मागील अनेक दिवसापासून रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता करण्याची मागणी होत आहे.
डासांची उत्पत्ती वाढली
वडवणी : शहरातील गटारींची स्वच्छता मागील काही महिन्यापासून करण्यात आलेली नाही. उघड्या गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वडवणीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता करण्याची मागणी आहे.
धारुर-आसोला रस्त्याची दुरवस्था
धारुर : धारुर ते असोला या आठ किलोमीटर रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवासी वैतागले आहेत. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ प्रशासनाने बुजवावेत तसेच वाहनांचे होणारे नुकसान आणि अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
कार्यालयांना गाजर गवताचा वेढा
पाटोदा : शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.