कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:13+5:302021-03-22T04:30:13+5:30
केज : केज तालुका व परिसरात सध्या रबीची पिके बहरात आली असून लवकरच कापणी सुरू होणार आहे. या पिकांना ...

कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करा
केज : केज तालुका व परिसरात सध्या रबीची पिके बहरात आली असून लवकरच कापणी सुरू होणार आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री वीजपुरवठा केला जात आहे. मात्र सध्या रात्री होणारा वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सोपे होईल, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
शिरूर कासार शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
बीड : गेल्या काही दिवसांपासून शिरूर कासार शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्या वाढल्याने नागरिकांत घबराट असून, त्यांच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मागील चोरीच्या प्रकरणात तपास लागत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. या चोऱ्यांना आळा घालून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
माजलगाव : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त वागत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे. मास्क हीच खरी कोरोनावरील लस आहे, असेही ते म्हणाले. परंतु याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असून, मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष होत असताना सर्रासपणे दिसून येत आहे.
वाहतूक सुसाट; अपघातात होतेय वाढ
गेवराई : शहरात मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने सुसाटपणे चालविली जात आहेत. परिणामी, लहान-मोठ्या अपघाताच्या घटना वाढत आहेत. १९ वर्षांखालील अनेक मुले व मुली यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वेगात वाहन चालवितात. प्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या- जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत.
तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
आज व उद्या सोडत
बीड : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) प्रवर्गातील पात्र ४७० लाभार्थ्यांना २ दुभत्या जनावरांचे गट वाटप व १८७ पात्र लाभार्थ्यांना १० व १ शेळी गट वाटप करण्यासाठी २२ व २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे सोडत होणार आहे.