प्राध्यापक महिलेचा विनयभंग, प्राध्यापकाला ५ वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:54+5:302021-03-05T04:33:54+5:30
बीड : शहरातील प्राध्यापक महिलेचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी गजानन नरहरी करपे, रा. स्वराज्यनगर, ...

प्राध्यापक महिलेचा विनयभंग, प्राध्यापकाला ५ वर्षे शिक्षा
बीड : शहरातील प्राध्यापक महिलेचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी गजानन नरहरी करपे, रा. स्वराज्यनगर, बीड यास पाच वर्षे सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील विशेष अतिरिक्त सत्र न्या. डी.एन. खडसे यांच्या न्यायालयाने सुनावली.
१४ नोव्हेंबर २०१७ रोजी बीड येथील एका खासगी महाविद्यालयातील प्रा. गजानन करपे याने त्याच महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केला होता. करपे याने पीडित महिलेच्या दूरध्वनी क्रमांकावर सोशल मीडियाद्वारे अश्लील व्हिडीओ असलेली लिंक पाठवून तिला लाज वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाने गजानन करपे यास निलंबित केले होते. त्यानंतर करपे याने पुन्हा १४ फेब्रुवारी २०१८ रोजी रस्त्यात अडवून पीडितेला जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला.
या घटनेच्या अनुषंगाने पीडितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार विनयभंग, ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी तपास केला.
स्पेशल ॲट्रॉसिटी सेशन केस ८/२०१८ नुसार न्यायालयात अंतिम दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपीस दाेषी ठरवून विशेष अतिरिक्त सत्र न्या. डी.एन. खडसे यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली.
--------
८ साक्षीदार तपासले
या प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीने दिलेली फिर्याद व साक्षीदारांचा जबाब ग्राह्य धरून आरोपींविरुद्ध पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी गजानन करपे यास दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. बी.एस. राख यांनी काम पाहिले. फिर्यादी प्राध्यापक महिलेच्या वतीने ॲड. अविनाश गंडले यांनी काम पाहिले.
----------