परळी जिल्ह्याची निर्मिती करा; भाजपच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 16:29 IST2018-02-21T16:24:06+5:302018-02-21T16:29:09+5:30
प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्हयाचा दर्जा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

परळी जिल्ह्याची निर्मिती करा; भाजपच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन
परळी ( बीड ) : प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्हयाचा दर्जा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीबाबत भाजपतर्फे आज तहसीलदारांना निवेदन दिले देण्यात आले.
आज दुपारी तहसील कार्यालयात भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे परळी जिल्हा निर्मिती करावी या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार बरदाळे यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी परळी जिल्हा निर्मितीच्या घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश गिते, प्रकाश जोशी, अरूण टाक, प्रा. दासू वाघमारे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मेनकुदळे, मोहन जोशी, सचिन गिते, नितीन समशेटे, अरूण पाठक, अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, गोविंद चौरे आदींची उपस्थिती होती.
जिल्हयासाठी परळीच योग्य
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध शहर आहे. येथे असलेला औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून तयार होणा-या वीजेचा राज्यासह संपूर्ण देशाला पुरवठा होतो. दळणवळणाच्या दृष्टीने याठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, ज्यामुळे शहराचा इतर राज्यातील प्रमुख शहरांशी आर्थिक व व्यवसायिकदृष्ट्या चांगला संपर्क आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर हे शहर आता आले असून शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. वीज केंद्र, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग यामुळे याठिकाणी उद्योग व व्यापार वाढीला मोठी चालना मिळाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व त्याच्याशी संलग्न असलेले वीज निर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी यामुळे साखर उत्पादन होण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरूणांना आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. शहर व तालुक्याचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा विषयक वातावरण अतिशय चांगले असून अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करून शहराचा नावलौकिक वाढवला आहे.
सध्या परळी हे तालुक्याचे ठिकाण असले तरी कापूस उत्पादक पणन महासंघ, पाटबंधारे विभागाचे व अन्य काही विभाग स्तरावरचे कार्यालय याठिकाणी आहेत. शहर व तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. वाण धरणात सदैव मुबलक पाणी असल्याने पाण्याची टंचाई या भागाला अजिबात जाणवत नाही. आताचे जिल्हयाचे ठिकाण येथून शंभर किमी दूर व प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अतिशय गैर सोयीचे व त्रासदायक आहे. त्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने हे शहर भौगोलिकदृष्ट्या व जनतेच्या सोयीसाठी योग्य आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.