आरोग्य केंद्रात गैरहजर राहून खासगी सेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:58 IST2019-11-15T23:57:24+5:302019-11-15T23:58:04+5:30
सरकारी सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नाही. मात्र, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे कायम गैरहजर राहून खाजगी सेवा करीत असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य केंद्रात गैरहजर राहून खासगी सेवा!
बीड : सरकारी सेवेत असताना खासगी व्यवसाय करता येत नाही. मात्र, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे कायम गैरहजर राहून खाजगी सेवा करीत असल्याचे समोर आले आहे. याचा फटका सामान्यांना बसत असून वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही सरकारी डॉक्टरांचे खाजगी दवाखाने मोठ्या प्रमाणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंमळनेर येथे करोडो रूपये खर्चून सुसज्ज अशी आरोग्य केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. येथे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. मात्र, हे दोन्ही डॉक्टर गायब रहात असल्याने सामान्य रूग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी अचानक भेट दिल्यानंतर हे सत्य समोर आले. कायम गैरहजर राहण्याचे कारण शोधले असता येथील डॉ.राजेंद्र खरमाटे यांचे खरवंडी (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथे, तर डॉ. परमेश्वर बडे यांचे शिरूर येथे खाजगी दवाखाना आहे. यामुळेच दोघेही केंद्रात गैरहजर रहात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पाटोदा येथे डॉ.पवार यांनी आढावा बैठक बोलावली होती. येथे प्रसुतीबद्दल त्यांनी सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती.
अंमळनेर आरोग्य केंद्राच्या तक्रारीबद्दलही त्यांनी तात्काळ खुलासा करण्यास सांगितल्याचेही सूत्रांनी सांगितले होते. याबाबत डॉ.खरमाटे व डॉ.बडे या दोघांचीही बाजू समजून घेण्यात आली. त्या दोघांनीही खाजगी सरावाला दुजोरा दिला आहे.