पोलिसांसाठी लाच घेताना खासगी इसमास रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:30+5:302021-06-24T04:23:30+5:30
बीड : राख वाहून नेणारे हायवा सिरसाळा हद्दीतून चालविण्याकरिता पोलिसांसाठी ला. स्वीकारताना खासगी इसमाला उस्मानाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...

पोलिसांसाठी लाच घेताना खासगी इसमास रंगेहात पकडले
बीड : राख वाहून नेणारे हायवा सिरसाळा हद्दीतून चालविण्याकरिता पोलिसांसाठी ला. स्वीकारताना खासगी इसमाला उस्मानाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी सिरसाळा येथील सोनपेठ चौकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उमेश कनकावार, गजानन येरडलवार या दोन पोलीस शिपयांसह नदीम मोहसीन पठाण या खासगी इमाविरुद्ध सिरसाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिरसाळा हद्दीतून राखेची हायवाद्वारे वाहतूक करण्यासाठी सिरसाळा ठाण्यातील पोलीस शिपाई उमेश कनकावार, गजानन येरडलवार यांनी नऊ हजार रुपयांची मागणी केेली होती. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २२ जून रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार २३ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पो. शिपाई कनकावार आणि येरडलवार यांनी नऊ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती सहा हजार रूपये खासगी इसम नदीम पठाण याच्या हस्ते स्वीकारण्याचे मान्य केले. त्यावरून सोनपेठ चौकात कनकावार आणि येरडलवार यांच्या सांगण्यावरून सहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, उस्मानाबादचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, अंमलदार दत्तात्रय करडे यांनी ही कारवाई केली. तपास बीड येथील ला. प्र. विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी करीत आहेत.