तलाठ्यासह खाजगी इसमाला ५० हजारांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:56+5:302021-01-10T04:25:56+5:30
बीड : तलावासाठी संपादित क्षेत्र सातबाऱ्यावरून कमी न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह ती स्वीकारणाऱ्या खाजगी इसमाला लाचलुचपत ...

तलाठ्यासह खाजगी इसमाला ५० हजारांची लाच घेताना पकडले
बीड : तलावासाठी संपादित क्षेत्र सातबाऱ्यावरून कमी न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह ती स्वीकारणाऱ्या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. केज तहसीलच्या आवारात टाकळी सजाच्या अनधिकृत कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टाकळी सजाचा तलाठी दयानंद शेटे व खाजगी इसम सचिन सुदर्शन घुले या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने खरेदी केलेल्या २३ आर जमिनीपैकी ८ आर क्षेत्र पाझर तलावासाठी संपादित झाले आहे. ते सातबाऱ्यावरून कमी न करण्यासाठी तलाठी दयानंद शेटे याने ७ जानेवारी रोजी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले, तसेच लाचेची रक्कम खाजगी इसम सचिन घुले याच्याकडे देण्यास सांगितले. ९ जानेवारी रोजी खाजगी इसम सचिन घुले याला लाचेचे ५० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डाॅ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी, हनुमंत गोरे, प्रदीप वीर, मनोज गदळे, चालक संतोष मोरे, गणेश म्हेत्रे आदींनी सापळा यशस्वी केला.