तक्रार नसली तरी खासगी रुग्णालयांचे होणार 'ऑडिट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:45+5:302021-03-21T04:32:45+5:30
बीड : खासगी रुग्णालयांमध्ये वाढीव बिलांसंदर्भात आतापर्यंत तरी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार झालेली नाही. असे असले तरी या सर्वच ...

तक्रार नसली तरी खासगी रुग्णालयांचे होणार 'ऑडिट'
बीड : खासगी रुग्णालयांमध्ये वाढीव बिलांसंदर्भात आतापर्यंत तरी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार झालेली नाही. असे असले तरी या सर्वच रुग्णालयांचे ऑडिट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आठवडाभरात याची बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच अनुषंगाने शहरासह जिल्हाभरात खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली. त्यांना उपचार व बिल आकारण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही दिल्या. असे असले तरी या खासगी रुग्णालयांमध्ये लाखोंची बिले काढली जात आहे. आपला रुग्ण बरा झाल्याने आणि तक्रार केल्यावर पुन्हा अडचणी येतील, या भीतीने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळेच लाखोंची बिले भरूनही नागरिक लेखी तक्रार करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आतापर्यंत आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात एकही तक्रार आलेली नाही. असे असले तरी खासगी रुग्णालयांची तपासणी आणि त्यांनी आकारलेल्या बिलांचे ऑडिट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि उपसंचालकांचा प्रतिनिधी असे पथक हे ऑडिट करणार आहे. यात त्रुटी आढळताच कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात बैठक बोलावली असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी माहिती डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड उपस्थित होते.
वाढीव बिले घेतल्यास तक्रार करा
खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपये बिले आकारली जात आहेत. परंतु अनेकांना माहिती नसल्याने ते तक्रारी करीत नाहीत. परंतु याची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत एक समिती तयार केलेली आहे. तक्रार येताच त्यांच्याकडून चौकशी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी वाढीव बिलासंदर्भात आरोग्य विभागाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तर विनाकारण कोणाला टार्गेटही करू नये, असेही आवाहन केले आहे.