अवैध सावकारीप्रकरणी निवास, दुकानावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:26 IST2017-12-03T00:25:51+5:302017-12-03T00:26:17+5:30
अवैधरित्या सावकारी करणा-या एका इसमाच्या आदर्श नगर येथील निवासस्थानी व नगर रोड येथील दुकानावर सहकार विभागाच्या सावकार निबंधकांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी छापा मारुन कारवाई केली. या कारवाईत जमिनीचे खरेदीखत, शंभर रुपयांचे मुद्रांक आढळून आले. पथकाने पंचनामा करुन ते सर्व ताब्यात घेतले आहे. या कारवाईने अवैध सावकारी करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अवैध सावकारीप्रकरणी निवास, दुकानावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अवैधरित्या सावकारी करणा-या एका इसमाच्या आदर्श नगर येथील निवासस्थानी व नगर रोड येथील दुकानावर सहकार विभागाच्या सावकार निबंधकांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी छापा मारुन कारवाई केली. या कारवाईत जमिनीचे खरेदीखत, शंभर रुपयांचे मुद्रांक आढळून आले. पथकाने पंचनामा करुन ते सर्व ताब्यात घेतले आहे. या कारवाईने अवैध सावकारी करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैध सावकारी विरोधात कारवाईचे शासनाचे निर्देश आहेत. या संदर्भात तक्रार येताच आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सहकार विभागाला सुचीत केले आहे. महाराष्टÑ सावकारी कायदा अधिनियम २०१४ कायदा अस्तित्वात आला. परंतु, या कायद्याची पूर्ण माहिती नसल्याने शेतकरी, अल्पभूधारकासह आर्थिक संकटातील लोक सावकारी पाशात अहकतात. अनेकवेळा दबावामुळे, भितीमुळे अनेक लोक कारवाई करण्यास धजावत नाहीत.
दरम्यान काही अन्यायग्रस्तांनी जिल्हा उपनिबंधक तथा सावकार निबंधक कार्यालयात दोन महिन्यांपुर्वी तक्रार करुन न्याय मागितला होता.
या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी गुप्तता बाळगून १७ नोव्हेंबर रोजीछापा टाकून कार्यवाही केली. पाच तास चाललेल्या या कारवाईत संबंधित सावकाराच्या राहत्या घरातून कायदेशीर पंचनामा करुन काही आक्षेपार्ह दस्तावेज ताब्यात घेतले. यात खरेदीखत, कोरे मुद्रांक, मुदतवाढ इसार पावती आदी आढळल्याचे सुत्रांनी सांगतिले. या कारवाईत सहकार अधिकारी श्रेणी- १, एस. एस. माळी, उपनिबंधक ए. एन. शिंदे, आर. एस. ठोसर यांचा समावेश होता.
आधी घरझडतीला नकार, नंतर दिला होकार
पथकाने शत्रुघ्न चौरे यांच्या घरासमोर आल्यानंतर अधिकारी व कर्मचाºयांनी ओळखपत्र दाखवून घरझडतीबाबत सांगितले. सुरुवातीला त्यांनी नकार दर्शविला. त्यानंतर शत्रुघ्न चौरे यांचे चुलते हे आल्यानंतर सूचनापत्रावर स्वाक्षरी केली. या कारवाईत खरेदीखताची झेरॉक्स, शंभर रुपयांच्या मुद्रांकावरील मूळ इसारपावती, मुदतवाढ इसारपावती अशा २३ पावत्या व एक डायरी जप्त करण्यात आली. ज्या बाबी कागदपत्रे, सावकारीशी संबंधित नाहीत त्या चौरे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आल्या. चौरे यांच्या नगररोडवरील दुकानावर केलेल्या कार्यवाहीत त्यांनी तीन लाल रंगाच्या वह्या तपासणीसाठी दिल्या. त्यामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्या नाहीत. त्यानंतर दुकानाची झडती घेतली. त्यातही काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे पथकप्रमुख आर. एस. ठोसर यांच्या अहवालात नमूद आहे.