घरगुती गॅस सिलिंडरचे दर सात महिन्यांत २०० रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:36+5:302021-07-04T04:22:36+5:30
गृहिणींनो करा बचत : ८४० रुपये प्रति सिलिंडर महिनाभरात झाली २५ रुपयांची वाढ : सामान्यांचे किचन बजेट कोलमडले अंबाजोगाई ...

घरगुती गॅस सिलिंडरचे दर सात महिन्यांत २०० रुपयांनी वाढले
गृहिणींनो करा बचत : ८४० रुपये प्रति सिलिंडर
महिनाभरात झाली २५ रुपयांची वाढ : सामान्यांचे किचन बजेट कोलमडले
अंबाजोगाई : घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून सलग तीन महिने गॅसचा दर स्थिर होता. मात्र आता पुन्हा केंद्र सरकारने गॅसचा दर वाढवला आहे. बीड जिल्ह्यात गॅसचा आता ८४० रुपये प्रति सिलिंडर एवढा दर आहे.
कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबरमध्ये ६०० रुपयांना मिळणारा १४ किलोचा एक सिलिंडर हा आता ८४० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या सामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत आहे.
कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर गेल्या काही नोव्हेंबरपासून आतापर्यंत दरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वांत जास्त वाढ ही मार्च महिन्यात करण्यात आली होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात ७२४.५० रुपये दराने गॅस मिळत होता. तर मार्च महिन्यात हाच दर ८२४.५० रुपये झाला. एकाच महिन्यात सरकारने या दरात १०० रुपयांची वाढ केली आहे, तर सात महिन्यात प्रति सिलिंडर २०० रुपयांनी महागला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने गॅससोबतच इतर इंधनाच्या दरातदेखील सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा ताण पडत आहे. गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दरदेखील वाढतच आहेत.
आता पुन्हा चूल पेटवायची का?
सरकारने उज्ज्वला योजनेत सामान्यांसाठी गॅस कनेक्शन मोफत दिले. त्यानंतर गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली. आधी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. नंतरच्या काळात ही सबसिडीदेखील बंद करण्यात आली.
त्यामुळे ज्यांनी उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन घेतले. त्यांच्या घरात आता पुन्हा चूल पेटवायची वेळ आली आहे. कारण गरीब घरांमध्ये ८४० रुपये दराने गॅस परवडेल कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे,
असे वाढले दर
नोव्हेंबर २०२०- ५९९.५०
डिसेंबर २०२० -६४९.००
जानेवारी २०२१-६९९.५० -
फेब्रुवारी २०२१-७२४.५०
मार्च २०२१-८२४.५०
एप्रिल २०२१-८१४.५०
मे २०२१-८१४.५०
जून २०२१-८१४.५०
जुलै २०२१-८४०
प्रतिक्रिया
सिलिंडरची दरवाढ चिंतेची बाब
सिलिंडर आणि जीवनाश्यक वस्तूंची होणारी दरवाढ गृहिणींसाठी चिंतेचा विषय झाला आहे. भाजीपाला, पेट्रोलच्या भाववाढीने त्यात भर टाकली आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले तर दुसरीकडे सरकार भाववाढ करून आगीत तेल ओतत आहे.
- :अन्विता दाणी,
गृहिणी
गॅसची दरवाढ मागे घ्यावी
सिलिंडरच्या किमती कमी करण्याऐवजी वाढवून सरकार सर्वसामान्यांवर दडपण आणत आहे. सर्व वस्तूंच्या दरवाढीने गृहिणी त्रस्त आहेत. प्रत्येक महिन्याला गॅस खरेदी करताना वस्तूंचे दर वाढलेले असतात. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातही पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.
- अल्का पांडव, गृहिणी