कोविडचा मुकाबला करण्यासाठी आता गावागावात प्रतिबंधक दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:12+5:302021-04-17T04:34:12+5:30

बीड : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेत पुढील काही दिवस आव्हानाचे असून, सजग राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ...

Preventive forces are now in the villages to combat Kovid | कोविडचा मुकाबला करण्यासाठी आता गावागावात प्रतिबंधक दल

कोविडचा मुकाबला करण्यासाठी आता गावागावात प्रतिबंधक दल

Next

बीड : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेत पुढील काही दिवस आव्हानाचे असून, सजग राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोविड प्रतिबंधक दलाची स्थापना करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील एक महिन्यापासून बीड जिल्ह्यात दररोज सरासरी ७०० ते ८०० रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामीण भागातही कोविडचा शिरकाव आणि फैलाव वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावपातळीवर यंत्रणा सतर्क करण्यासाठी ग्राम पंचायतींनी कोविड प्रतिबंधात्मक दल स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यांचा असेल समावेश

कोविड प्रतिबंधात्मक दलामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, स्वच्छताग्रही, गावातील सुजान नागरिक व तरुण मंडळाचे प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश असेल. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या दलाने गांभीर्याने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत.

अशी असेल पंचसूत्री

कोविडचा प्रसार होऊ नये, यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन, नियमित मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, तसेच गावामध्ये नियमांचे उल्लंघन करून लग्नसमारंभ, अंत्यविधी, इतर सण व समारंभ होणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेणे, मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, हगवण ही अलीकडच्या कालावधीत लक्षणे आढळली असतील तर संबंधितांची कोविड चाचणी व निदान नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेतच करून घेण्यासाठी दलाने लक्ष ठेवावे.

गावातील खासगी दवाखाने, औषध दुकानात कोविडसदृश लक्षणांसाठी परस्पर उपचार घेणाऱ्या नागरिकांना वेळेत कोरोना चाचणीचे महत्त्व पटवून सांगावे. साठ वर्षे वयावरील वृद्ध नागरिक, एकल व्यक्ती, उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग व इतर सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे, जिल्ह्याबाहेरून गावात येणाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम दलाने करणे अपेक्षित असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ग्रामपंचायतींचे मूलभूत कर्तव्य

गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे समान न्यायाच्या तत्त्वाचा अवलंब करून ग्रामपंचायतच्या कोविड प्रतिबंधात्मक दलाने पंचसूत्रीचा प्रभावी अंमल करून नमूद सूचनांचे पालन होण्यासाठी काम करावे. यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. - अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बीड.

Web Title: Preventive forces are now in the villages to combat Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.