बीड : जिल्ह्यात आराेग्य विभागाकडे असलेल्या रुग्णवाहिकाच सध्या आजारी पडल्या आहेत. दरवाजे तुटले असून, टायरही खराब झाले आहेत. अपवादात्मक वगळता इतर रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या आहेत. याच भंगार रुग्णवाहिकांमधून गर्भवती व गंभीर आजार असलेल्या रुग्णांना प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, रस्ताही खराब असल्याने दणक्यांचाही सामना करावा लागतो.
जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आस्थापनेवर १८, तर जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्या आस्थापनेवर ५२ आरोग्य संस्था आहेत. या ठिकाणी जननी सुरक्षा योजना व मोबाईल युनिट, १०८ अशा ११३ रुग्णवाहिका आहेत. पैकी ९२ रुग्णवाहिका सुरू असून, ६ तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीला गेलेल्या आहेत. १५ रुग्णवाहिका या कायमस्वरुपी बंद म्हणून भंगारात गेल्या आहेत. असे असले तरी, ग्रामीण भागात धावणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिका भंगार झाल्या आहेत. त्यांचे दरवाजे, सीट, बॉनेट, काचा तुटल्या असल्याचे दिसते. अगोदरच रस्ते खराब आणि त्यात रुग्णवाहिका भंगार असल्याने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. असे असतानाही आरोग्य विभागाकडून नवीन वाहन खरेदी अथवा आहे त्यांची व्यवस्थित दुरुस्ती होत नसल्याचे दिसते. त्यामुळे या रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
१५ वाहने जाणार स्क्रॅपमध्ये
जिल्ह्यातील १५ रुग्णवाहिका या कालबाह्य झाल्याने स्क्रॅपमध्ये टाकल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाकडून तशी कारवाईही केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच आरोग्य केंद्रातील वाहनांचीही जवळपास २००५ नंतर खरेदी झालेली आहे. त्यामुळे शासन नियमानुसार या वाहनांचा कालावधी १५ वर्षे पूर्ण होत आहे. ही वाहनेसुद्धा भंगारात निघणार असल्याचे सांगण्यात आले.
आकडेवारी
एकूण रुग्णवाहिका ११३
चालू रुग्णवाहिका ९२
बंद ६
स्क्रॅपमध्ये जाणार १५