निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:50+5:302020-12-27T04:24:50+5:30
दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही ...

निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था
दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. खाजगी व बी.एस.एन.एल. कंपनीची सेवा चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे तक्रार नेमकी कुठे व कोणाकडे करायची. ही समस्या कोण सोडवणार असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
शहरातील अंतर्गत रस्ते खराब
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर गतिरोधक व खड्डे अधिक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. लहान मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था असल्याने परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत राऊत यांनी केली आहे.
पेरू स्वस्त
अंबाजोगाई : कडाक्याच्या थंडीत खोकला, सर्दी वगैरेंचे दुखणे टाळण्यासाठी शहरवासीयांनी पेरू खरेदी टाळल्याने पेरूचे भाव कोसळले आहेत. अंबाजोगाईच्या बाजारपेठेत पेरूची आवक वाढली. मात्र ग्राहक पेरू खरेदीसाठी तयार नाहीत. २० रुपये किलोपर्यंत चांगले पेरू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
सुधारित किमान वेतनाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन कधी लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे करून गावाला स्वच्छता दिली. अनेक समाजोपयोगी कामे करूनही त्यांची उपेक्षाच होत आहे.
रासायनिक खतांची मागणी वाढली
अंबाजोगाई : सध्या रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. हरभरा, गहू, ज्वारी, करडई, कांदा, बटाटा यांच्याबरोबरच ऊस लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पेरणी होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. पिकांची खुरपणी, कोळपणी झाली. आता ऊस व इतर पिकांना खतांचा डोस देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. रासायनिक खतांची मागणी वाढल्याने अंबाजोगाई परिसरात कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.
भारनियमनामुळे रब्बी हंगाम धोक्यात
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, व ऊस लागवड आटोपली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके चांगली बहरली. यावर्षी चांगल्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाण्याची मोठ्या प्रमाणात मुबलकता झाली आहे. मात्र, महावितरणकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नाही. भारनियमन कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा, रात्रीची वीज या अनेक समस्यांमुळे विद्युत पंप चालत नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.