बीड पालिकेकडून राजकारण; राष्ट्रवादीच्या आमदारांचे बॅनर हटविले, शिंदे गटाचे तसेच ठेवले
By सोमनाथ खताळ | Updated: February 10, 2023 17:44 IST2023-02-10T17:42:26+5:302023-02-10T17:44:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यासाठी शिवप्रेमींना ओढ लागली आहे.

बीड पालिकेकडून राजकारण; राष्ट्रवादीच्या आमदारांचे बॅनर हटविले, शिंदे गटाचे तसेच ठेवले
बीड - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या सर्व बाजूने अनाधिकृत बॅनर लागले आहेत. यामुळे महाराजांच्या पुतळ्याचे वैभव झाकले असून अपघातासही निमंत्रण मिळत असल्याचे 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून शुक्रवारी निदर्शनास आणले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि दुपारीच बीड पालिकेने पोलिसांच्या मदतीने बॅनर हटविण्यास सुरूवात केली. परंतू यात दुजाभाव केल्याचेसमोर आले आहे. राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर यांचे बॅनर आगोदर हटविले असून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे बॅनर जैसे थेच होते. पालिका मुख्याधिकारी नीता अंधारे व प्रशासक नामदेव टिळेकर यांच्याकडूनही कारवाईत 'राजकारण' केल्याचा आरोप होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यासाठी शिवप्रेमींना ओढ लागली आहे. या दिवशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दिवसभर अभिवादनासाठी शिवभक्तांची रिघ लागते. याला आठवडा बाकी असतानाच आतापासून चौकात सर्व बाजूने बॅनर लागले आहेत. हे सर्व बॅनर अनाधिकृत आहेत. यामुळे महाराजांच्या पुतळ्याचे वैभव झाकले जात आहे. शिवाय अपघातासही निमंत्रण मिळत आहे. हाच धागा पकडून 'लोकमत'ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते. यावर बीड पालिका व पोलिसांनी हे बॅनर हटविण्याची मोहिम हाती घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासक नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी निता अंधारे यांची बैठकही झाल्याची माहिती आहे. परंतू हे बॅनर हटविताना अंधारे व टिळेकर यांनी 'राजकारण' केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर यांचे बॅनर सर्वात आगोदर हटविण्यात आले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लागलेल्या बॅनरला अभय देण्यात आले आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासक नामदेव टिळेकर यांना संपर्क केला असता आपण मिटींगमध्ये असल्याचा मेसेज त्यांनी पाठवला. मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याने त्यांची बाजू समजली नाही.
बीडकरांकडून 'अभिनंदन' आंदोलनातून टोमणा
याच बॅनरच्या प्रश्नावर तुम्ही आम्ही बीडकर यांच्याकडून शुक्रवारी सकाळी 'अभिनंदन आंदोलन' करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, प्रशासक टिळेकर, मुख्याधिकारी अंधारे यांचे फोटो लावून बॅनर झळकवण्यात आले. बॅनर लावणाऱ्यांना अभय देणाऱ्यांना प्रशासनाचा या आंदोलनातून निषेध नोंदविण्यात आला. तसेच न्यायालयाचा अवमान करणाऱ्या सीओ, प्रशासकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. हे अभिनंदन आंदोलन म्हणजे प्रशासनाला 'शालीतून जोडे' मारल्यासारखे आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, रामनाथ खोड, ॲड.राहुल मस्के, हमीदखान पठाण सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.