पाडळशिंगी येथे पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:32+5:302021-02-05T08:25:32+5:30
बीड : प्राथमिक आरोग्य केंद्र निपाणी जवळकाअंतर्गत पाडळशिंगी येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांना पोलिओची लस देताना ...

पाडळशिंगी येथे पोलिओ लसीकरण
बीड : प्राथमिक आरोग्य केंद्र निपाणी जवळकाअंतर्गत पाडळशिंगी येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांना पोलिओची लस देताना अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी, विजयसिंह शिंदे व जिल्हा सुपरवायझर आर. वाय. कुलकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास
बीड : शहरातील जव्हेरी गल्ली, जुना बाजार, बुंदेलपुरा, खासबाग आदी भागामधील पथदिवे बंद राहत असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी पथदिवे बंद असून, ते सुरू करण्याची मागणी आहे.
मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवा
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यासह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीकडे संबंधितांचे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
अतिक्रमण विळखा
केज : अंबाजोगाई-मांजरसुंबा या राज्यमार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या दरम्यानच बसस्थानक, शिवाजी चौक व प्रमुख बाजारपेठ असल्याने कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा वादाचे प्रसंगदेखील उद्भवत आहेत. कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव चालविली जात आहेत. या वाहनांमुळे लहान-मोठे अपघात या परिसरात सातत्याने होऊ लागले आहेत. महामार्ग तसेच स्थानिक वाहतूक शाखेकडून वाहनधारकांमध्ये जनजागृती करावी आणि अपघात टाळण्यासाठी मदत करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांमधून होत आहे.
गुटखा, दारू विक्री
बीड : तालुक्यातील पाली परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, व्यसनाधीनतेमुळे कुटुंबातील कलह वाढत चालले आहेत.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पाटोदा : तालुका आणि परिसरात वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तसेच शेतकरीदेखील त्रस्त झाले आहेत. या भागातील रोहित्र दुरुस्त करावेत, महावितरणचे अधिकृत लाईनमन नेमावेत, जुन्या तारा बदलाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी आहे.
पंपावर पारदर्शक पाईप बसवावा
रायमोहा : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी होत आहे.