माजलगाव - शहरातील अनेक लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून शहरातील संभाजी चौकात असलेल्या हॉटेल सुखसागर या आलिशान हॉटेलवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला,त्या ठिकाणी एका रूम मध्ये जुगार खेळताना शहरातील बड्या लोकांची सहा मुल पोलिसांना आढळून आली असून त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून या छाप्याची चर्चा होत आहे.
शहरातील अनेक लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यातच शहरात संभाजी चौकात असलेल्या आलिशान सुखसागर या हॉटेलमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला, त्यावेळी तेथील रूम नंबर २०१ मध्ये परिक्षीत सिद्धेश्वर जाधव, स्वप्निल अमरनाथ खुरपे,श्रीधर अशोक रांजवण,विश्वजीत प्रताप रांजवण,पृथ्वीराज रघुनाथ शेजुळ,मनोज विठ्ठल सोळंके हे बड्या घरचे सहा तरुण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या जुगाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांचे विरुद्ध जुगार कायद्यान्वये कारवाई केली. छाप्याची ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक के.बी.माकणे, हवालदार शेख अस्लम,महेश चव्हाण,अंगद घोडके,सुनील गवळी यांनी केली.
दरम्यान या हॉटेलमध्ये राजरोसपणे जुगार व इतर अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज हॉटेलच्या रूममध्ये जुगार खेळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात, यामध्ये काही राजकीय मंडळी देखील येत असतात.मात्र हॉटेल व्यवस्थापक सुरेश पुजारी यांनी आम्ही एका व्यक्तीच्या नावावर आधार कार्ड घेऊन रूम देतो,आता काय चालले माहिती नाही असे म्हणून हात झटकत असल्याने हॉटेल चालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.मोठा व्यवहार झाल्याची चर्चा
पोलिसांनी छापा टाकून पकडलेली मुले ही अतिशय श्रीमंताची होती. पोलिसांनी घेऊन जात त्यांच्यावर कारवाई केली असली तरी यात मोठा व्यवहार झाल्याची चर्चा शहर पोलीस ठाण्या समोर ऐकावयास मिळाली.
जुगार खेळण्यासाठी येतात दुरून लोक
शहरातील बायपास रोड असलेल्या या हॉटेलमध्ये परभणी , बीड , पाथरी ,मानवत आदि ठिकाणाहून दररोज दुपारी लोक जुगार खेळण्यासाठी येतात. त्याचबरोबर या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थीनींना या ठिकाणी बिनधास्तपणे आणले जात असल्याची चर्चा देखील या भागात दिसुन आली.