पोलीस पाटलाच्या खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST2021-06-26T04:24:07+5:302021-06-26T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे व काठी मारून खून करण्यात आला. ही ...

पोलीस पाटलाच्या खूनप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे व काठी मारून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. २४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
भीमराव नामदेव ससाने (वय ५९, रा.ढेकणमोहा) असे मयत पोलीस पाटलाचे नाव आहे. ते बीड तालुक्यातील मानखुरवाडी येथील पोलीस पाटील आहेत. त्यांचा गुरुवारी रात्री खून करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचमामा केला असता क्षुल्लक कारणावरून खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. पोलीस फिर्यादीवरून भीमराव ससाने यांचा मुलगा कृष्णा याला गावातीलच रवी मुरलीधर शिंदे याने बाहेर नेले होेते. मात्र, त्याला घरी सोडले असता त्याच्या हाताला मार लागलेला होता. त्यावेळी त्याचा भाऊ संतोष याने रवीच्या हाताला मार कसा लागला याचा जाब विचारला. यावरून दोघांत बाचाबाची व झटापट झाली. दरम्यान, रवी याला या घटनेचा राग आल्याने तो घरी गेला. घडलेला प्रकार त्याचा भाऊ व वडिलांना सांगितला. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी रवी मुरलीधर शिंदे, दीपक मुरलीधर शिंदे व मुरलीधर लिंबाजी शिंदे हे तिघे भीमराव ससाने यांच्या घरावर चाल करून गेले. त्यावेळी दोन्ही गटांत वाद झाला. यावेळी भीमराव यांना काठी व खोऱ्याने जबर मारहाण केल्यामुळे या भांडणात त्यांचा मृत्यू झाला; तर त्यांची दोन्ही मुले संतोष व कृष्णा ही जखमी झाली आहेत.
त्यानंतर या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी २५ जून रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक डी. पी. सानप हे करीत आहेत.
....
गुन्हा घडताच आरोपी फरार
पोलीस पाटील भीमराव ससाने यांचा भांडणादरम्यान खून झाल्यानंतर आरोपी रवी, दीपक व मुरलीधर शिंदे यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध पिंपळनेर पोलीस घेत आहेत. आरोपींना पकडल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे, असे पिंपळनेर पोलिसांकडून सांगण्यात आले.