कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:13+5:302020-12-29T04:31:13+5:30
बीड : अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार चरणसिंग पारसिंग वळवी ...

कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना पोलीस हवालदार पकडला
बीड : अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार चरणसिंग पारसिंग वळवी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील बसस्थानकाच्या पोलीस चौकीत ही कारवाई करण्यात आली. एका व्यक्तीवर अदखलपत्र गुन्हा दाखल होता. यात कारवाई टाळण्यासाठी हवालदार चरणसिंग वळवी याने ७ हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता हवालदार वळवी याने ७ हजार रुपयांची मागणी करून ती बसस्थानकातील पोलीस चौकीत स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. बसस्थानकाच्या पोलीस चौकीत पंचासमक्ष ६ हजार रुपयांची लाच घेताना हवालदार वळवी यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी, पो. ह. हनुमंत गोरे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अंमलदार म्हेत्रे, चालक कोरडे आदींनी हा सापळा यशस्वी केला.