बीडमध्ये भुसूधार कार्यालयात शेतक-याने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:12 IST2017-12-15T00:11:03+5:302017-12-15T00:12:00+5:30
इनामी जमीन विक्री परवानगीसाठी मागील वर्षभरापासून खेटे मारणाºया रावसाहेब टेकाळे (रा. नागापूर) या शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

बीडमध्ये भुसूधार कार्यालयात शेतक-याने घेतले विष
बीड : इनामी जमीन विक्री परवानगीसाठी मागील वर्षभरापासून खेटे मारणाºया रावसाहेब टेकाळे (रा. नागापूर) या शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात दुस-या मजल्यावर असणा-या भूसुधार कार्यालयाच्या आवारात घडली. शेतक-याची प्रकृती चिंताजनक असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टेकाळे यांना इनामी जमीन मिळालेली आहे. ती विक्री करण्यासाठी मागील वर्षभरापासून ते भूसुधार कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. भूसुधार कार्यालयाकडून तहसीलदारांकडे यासंबंधीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वीच पाठविल्याचे सांगून टेकाळे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. गुरुवारी पुन्हा ते भूसुधार कार्यालयात गेले, येथील अधिकारी, कर्मचाºयांना परवानगीबाबत विचारले असता नेहमीप्रमाणे त्यांनी टोलवाटोलवी केली. त्यामुळे वैतागलेल्या टेकाळे यांनी विष प्राशन केले.
ही घटना कार्यालयातील कर्मचा-यांनी पाहिली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. रुग्णालयात शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाखाळ यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक आले नव्हते. तसेच ठाण्यातही नोंद झाली नव्हती.