न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:27+5:302021-07-11T04:23:27+5:30
बीड : न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी ‘न्यूमोकोकल’ लसीकरण राज्यभरात केले जाणार आहे. बीड जिल्ह्याला आतापर्यंत तीन हजार डोस प्राप्त ...

न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू !
बीड : न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी ‘न्यूमोकोकल’ लसीकरण राज्यभरात केले जाणार आहे. बीड जिल्ह्याला आतापर्यंत तीन हजार डोस प्राप्त झाले आहेत. ९ महिन्यांपर्यंतच्या बाळाला तीन टप्प्यात तीन डोस दिले जाणार आहेत. बीड आरोग्य विभागाने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले आहे. ही लस बालमृत्यू रोखण्यास मदत करणार असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. हजारो लोकांचा बळीही गेला. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट जास्त त्रासदायक ठरली होती. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून ती लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने ‘न्यूमोकोकल’ लस आणली आहे. राज्यभरात ९ महिन्यांपर्यंतच्या बालकांना ही लस देण्याचे नियोजन केले जात आहे. बीड जिल्ह्यालाही तीन हजार डोस प्राप्त झाल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ. शेख रौफ यांनी सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप ही लस देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश आलेले नाहीत. आदेश येताच सर्वच आरोग्य संस्थांमध्ये बालकांना ही लस दिली जाणार आहे. बीड आरोग्य विभाग यासाठी सज्ज झाल्याचे सांगण्यात आले.
...
का दिली जाते ही लस?
न्यूमोकोकल नावाचे जिवाणू हे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यातच दोन वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये अधिक असतात. त्यामुळे न्यूमोनिया होतो. हे टाळण्यासाठी न्यूमोकाेकल लस दिली जाते. २०१७ साली देशातील वेगवेगळ्या पाच राज्यांत ही लस देण्यात आली हाेती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही लस आल्याचे कोरोना लसीकरणचे नोडल ऑफिसर डॉ. बाबासाहेब ढाकणे यांनी सांगितले.
---
खासगीत १५०० ते ५ हजार खर्च
‘न्यूमोकोकल’ ही लस खासगी रुग्णालयातही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. वेगवेगळ्या कंपनीनुसार एका डोसची किंमत १५०० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात ही लस मोफत दिली जाणार आहे.
---
जिल्ह्यात ‘न्यूमोकोकल’ लसीचे ३ हजार डोस आले आहेत. नवजात बालकांना ही लस दिली जाणार आहे. यासाठी तालुका, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-डॉ. शेख रौफ, नोडल ऑफिसर, बीड.
---
बीड जिल्ह्याला डोस प्राप्त -३०००