ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:30+5:302021-04-12T04:31:30+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. तालुक्यात वर्षभरापूर्वी अनेक ठिकाणचे रस्ते तयार करण्यात आले होते. ...

The plight of roads in rural areas | ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. तालुक्यात वर्षभरापूर्वी अनेक ठिकाणचे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, झालेल्या मोठ्या पावसामुळे व कंत्राटदारांनी काम करताना रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर, अनेक ठिकाणी रस्त्याची कामे झाली. मात्र, एक वर्षाचा कालावधी लोटला तरी रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात येणाऱ्या साइडपट्ट्यांची कामे अजूनही झाली नाहीत.

जीर्ण तारा, खांबामुळे धोका

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युतखांब व विद्युततारा जीर्ण झालेल्या आहेत. तर, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युतखांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युतखांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तांपडे यांनी केली आहे.

वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर भरदुपारी उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे सकाळच्या प्रहरीच कामे आटोपण्याकडे शेतकरीवर्गाचा कल दिसून येत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा राहत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे १०० रुग्ण निघाले, तर आज शनिवारी पुन्हा १४५ रुग्ण निघाले. तालुक्यात आजपर्यंत चार हजारांहून जास्त रुग्ण कोरोनाबाधित निघाल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

अंबाजोगाई : तालुक्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कडेकोट बंदोबस्त प्रत्येक चौकात तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये म्हणून पोलिसांच्या व्हॅन गस्त घालू लागल्या आहेत. तर, ग्रामीण भागातही ग्रामीण पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने गावोगावी गस्त सुरू असून ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे पोलीस यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

Web Title: The plight of roads in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.