जनावरांसाठी घातक ठरतोय प्लास्टिक पिशव्यातील कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:30+5:302021-01-04T04:27:30+5:30
शिरूर कासार : घर, हाॅटेल ,दुकानामधील टाकाऊ पदार्थ प्लास्टिक पिशव्यांत भरून फेकून दिले जातात. नंतर त्या पिशवीतील पदार्थ ...

जनावरांसाठी घातक ठरतोय प्लास्टिक पिशव्यातील कचरा
शिरूर कासार : घर, हाॅटेल ,दुकानामधील टाकाऊ पदार्थ प्लास्टिक पिशव्यांत भरून फेकून दिले जातात. नंतर त्या पिशवीतील पदार्थ खाण्यासाठी जनावरे तुटून पडतात. मात्र, ते खाताना प्लास्टिक पिशव्यादेखिल जनावरांच्या पोटात जातात. वारंवार अशा पिशव्या जनावरांच्या पोटात जाणे हे त्यांच्या जीविताला धोकादायक ठरत असलेतरी याचे गांभीर्य कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी बसस्थानकासमोर ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. गाय पिशवी खाताना एका लहान मुलाने पाहिली आणि त्याने त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन कदम यांनी ती पिशवी गायीच्या तोंडातून काढली. मात्र, सतत घटना घडत असल्याने सर्वांची जबाबदारी म्हणून प्लास्टिक पिशवीत पदार्थ फेकण्यापेक्षा ते अन्य मार्गाने टाकता येतील, अशी भावना जीवन कदम यांनी व्यक्त केली.
शहरात नित्यनियमाने नगरपंचायतीची घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी फिरत असते. तरीदेखील काही लोक बेपर्वाईचे प्रदर्शन करीत अशा प्रकारचे काम करतात. मोकळ्या जागी फेकलेल्या या पिशव्या अनाहुतपणे जनावरांच्या पोटात जातात व त्या जीवघेण्या ठरतात. प्लास्टिकबंदीचा विसर सर्वांनाच पडल्याचे दिसून येत आहे.
नगरपंचायत कारवाई करणार
नगरपंचायत स्वच्छता ठेवण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करीत आहे. तरीदेखिल अशाप्रकारे पिशव्यात भरून कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे अशोभनीय आहे. घरातील ,दुकानातील, हाॅटेल शिवाय अन्य नागरिकांनी असा बंद पिशव्यांत कचरा टाकू नये अन्यथा कार्यवाहीचा इशारा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिला.